मुक्त विद्यापीठात ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत’ ४० प्रशिक्षणार्थींची निवड
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचा शासन निर्णय क्र संकीर्ण 2024/प्र क्र 90/व्यशि-3, दि 9 जुलै, 2024 नुसार ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची (Internship)’ विद्यापीठात अंमलबजावणी करावी याबाबत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे यांनी सूचीत केले होते.
त्या अनुषंगाने मुक्त विद्यापीठाच्या व्यावसायीक शिक्षण व कौशल्य विकास विद्याशाखेने महाराष्ट्र शासनाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर विद्यापीठाची नोंदणी केली. तदनंतर विद्यापीठाला ४० पदवीधर प्रशिक्षणार्थी नियुक्त करण्यासाठी शासनाच्या याच संकेतस्थळावरून ३० ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते.
त्यानुसार एकूण ४९५ प्राप्त अर्जातून एकूण ४० प्रशिक्षणार्थीची निवड करण्यात आली आहे. विद्यापीठाने ४० प्रशिक्षणार्थींना नियुक्ती आदेश दिले असून आठवडाभरात त्यांनी सबंधित विभागात रुजू व्हावे असे कळविले आहे. सदर प्रशिक्षणार्थींचा प्रशिक्षण कालावधी हा ते रूजु झाल्यानंतर 6 महिने कालावधीसाठी राहील.
या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थीस प्रत्यक्ष कामाचा अनुभव यावा व त्याच्यात कौशल्यवृद्धी व्हावी व त्यामुळे प्रशिक्षणार्थीस विविध क्षेत्रात रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध व्हाव्यात असा उद्देश आहे.
महाराष्ट्र शासन या प्रशिक्षणार्थींना त्यांच्या बॅंक खात्यात दरमहा रु. १०,०००/- विद्यावेतन ऑनलाईनद्वारे अदा करेल. निवड करण्यात आलेले प्रशिक्षणार्थी विद्यापीठ मुख्यालय, तसेच विद्यापीठाच्या विभागीय केंद्रात प्रशिक्षणार्थी म्हणून कार्य करतील. अशी माहिती विद्यापीठाच्या व्यावसायिक शिक्षण व कौशल्य विकास विद्याशाखेचे संचालक
प्रा राम ठाकर यांनी दिली.
पदवीधर उमेदवारांना विद्यापीठात प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा व त्यांच्यातील कौशल्यात वाढ व्हावी या हेतूने ४० प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात आली आहे.
कुलगुरू प्रा संजीव सोनवणे