श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत २२ प्रशिक्षणार्थीची निवड
परभणी : महाराष्ट्र शासनाचा मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने पात्र २२ प्रशिक्षणार्थीची निवड करण्यात आली आहे. त्यांना नुकतेच निवड पत्र देण्यात आले.
या अंतर्गत कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा परिचर तसेच शिपाई अशा २२ पदाकरिता प्रशिक्षणार्थींची निवड करावयाची होती. यासाठी शासनाने ऑनलाइन अर्ज मागविले होते. महाविद्यालयाने या रिक्त जागा शासनाच्या पोर्टलला दाखल केल्या होत्या. यासाठी ऑनलाइन पद्धतीने ९२ प्रशिक्षणार्थीने पोर्टलला नोंदणी केली होती. त्यापैकी पात्र प्रशिक्षणार्थींची निवड महाविद्यालयाने केली.
त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी १४ ऑगस्ट रोजी शहरातील शारदा महाविद्यालयामध्ये परभणी जिल्हा कौशल्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केली होती. सोमवार (दि २०) रोजी महाविद्यालयामध्ये संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा महाविद्यालय विकास समिती प्रमुख हेमंतराव जामकर, सदस्य टी एम देशमुख, प्राचार्य डॉ बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ रोहिदास नितोंडे यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थीस नियुक्तीपत्रे वितरीत करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी या योजनेची भूमिका विशद करून प्रशिक्षणार्थींना कार्याचे स्वरूप समजावून सांगितले व प्रशिक्षणार्थीचे अभिनंदन करून पुन्हा पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नोडल अधिकारी डॉ प्रल्हाद भोपे ही यांची उपस्थिती होती.