मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणांतर्गत अमरावती विद्यापीठात १५ विद्यार्थ्यांची इंटर्नशीपसाठी निवड

कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांचे हस्ते इंटर्नशीप पत्राचे वितरण
महाराष्ट्रामध्ये प्रथमत: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात या योजनेचा शुभारंभ

अमरावती : महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राज्यातील रोजगार इच्छुक युवकांना कार्य प्रशिक्षणाची संधी मोठ्या प्रमाणात मिळावी, याकरीता सुरु केली असून या योजनेंतर्गत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामध्ये 30 विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. त्यापैकी 15 विद्यार्थ्यांची इंटर्नशीपसाठी निवड करण्यात आली असून कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांचे शुभहस्ते विद्यार्थ्यांना इंटर्नशीपचे पत्र वितरीत करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर कुलसचिव डॉ अविनाश असनारे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे उपायुक्त द ल ठाकरे, इन्क्युबेशनच्या समन्वयक डॉ स्वाती शेरेकर, सहा आयुक्त डॉ प्रांजली बारस्कर, कौशल्य विकास अधिकारी पी बी जाधव उपस्थित होते.

कुलगुरूंनी सर्वप्रथम इंटर्नशीपसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये इंटर्नशीपसाठी प्रक्रिया पूर्ण करुन विद्यार्थ्यांची निवड करणारे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ पहिले असल्याचा मला विशेष आनंद वाटतो. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी मन लावून व निष्ठेने कामे करायची असून प्रशासकीय अनुभव मिळवावयाचा आहे. हा अनुभव भविष्यातील करिअरसाठी उपयोगी ठरणार आहे. पुढच्या रोजगाराच्या संधी त्यावर अवलंबून असणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी या माध्यमातून आपले स्कील विकसित करण्याचा प्रयत्न करावा. स्पर्धात्मक परिस्थिती लक्षात घेता या अनुभवाचा फायदा निश्चितच होणार आहे.

Advertisement

ज्या स्कीलच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड झाली आहे, ते स्कील महत्वाचे आहे. त्या स्कीलमध्ये वाढ करण्यासाठी आणि आपले व्यक्तिमत्व विकसित करण्याची संधी इंटर्नशीपच्या माध्यमातून तुम्हाला मिळाली असून या एक्स्पोझरचा फायदा विद्यार्थी निश्चितच घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रशासकीय कामे करीत असतांना विश्वासहार्यतेला तडा जाणार नाही, यासाठी विद्यार्थ्यांना दक्षता घ्यावयाची आहे, असेही कुलगुरू म्हणाले. याप्रसंगी ठाकरे यांनी सहा महिन्यांच्या इंटर्नशीपमध्ये विद्यार्थ्यांनी कार्यालयीन शिस्त आणि वागणूक व्यवस्थित ठेवावयाची आहे. नादी लागण्याचे कौशल्य तुमच्यात आले पाहिजे, म्हणजे भविष्यात पूर्णवेळ मनुष्यबळाची मागणी असेल, त्यावेळी तुमचा निश्चितच विचार होईल. शिस्तीने व चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण पूर्ण करा, असेही ते विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले.

डॉ स्वाती शेरेकर यांनी मनोगतातून सांगितले की, पोर्टलवर 218 अर्ज प्राप्त झाले होते, त्यामधून 87 विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड आणि त्यामधून 15 विद्यार्थ्यांची अंतीम निवड इंटर्नशीपसाठी करण्यात आली. लवकरच आणखी 15 विद्यार्थ्यांची निवड करणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. कुलसचिव डॉ अविनाश असनारे यांनी निवड झालेले विद्यार्थी प्रशासकीय जबाबदारी सक्षमपणे पार पाडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रत्येकाने संस्थेप्रती आस्था ठेवून व जबाबदारीने कार्य करावे आणि विद्यापीठासारख्या मोठ्या संस्थेमध्ये मिळालेल्या संधीचे सोने करावे, असे सांगून काही अडचण असल्यास त्यांना संपर्क साधावा, असेही ते म्हणाले.

विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन

विद्यापीठाच्या मंजूर पदांपैकी 5 टक्के पदे इंटर्नशीपच्या माध्यमातून भरली जाणार असून 15 विद्यार्थ्यांची इंटर्नशीपसाठी निवड अजून करावयाची आहे. याकरीता पदवी / पदव्युत्तर आणि संगणक हाताळण्याचे कौशल्य असणारे विद्यार्थी, 18 ते 35 वर्षे वयोगटात मोडणारे, महाराष्ट्राचे निवासी, ही पात्रता निकष पूर्ण करणा­या विद्यार्थ्यांला www.rojgar.mahaswayam.gov.in या महास्वयम पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन कुलसचिव डॉ अविनाश असनारे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत (इंटर्नशीपसाठी) सुवर्णा सोनोने, रुपेश वासनीक, निलेश पांडे, संकेत माने, नितीन गुल्हाने, अनिशा विधळे, ऋषिकेश हलदे, जीवन मेहरकर, मयुरी घारट, यश बजाज, आराध्य भालेराव, साक्षी मलांगे, साक्षी गोटे, निखील सपाटे, पवन हागे या विद्यार्थ्यांना यावेळी इंटर्नशीप पत्रे प्रदान करण्यात आली.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत शासकीय व निमशासकीय आस्थापनेला मंजूर पदांच्या 5 टक्के आणि खाजगी संस्थेमध्ये कार्यरत पदांच्या 20 टक्के जागेवर विद्यार्थ्यांना इंटर्नशीपची संधी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडून दिल्या जात आहे आणि याकरीता रू 10,000/- प्रती महिना सहा महिन्यांपर्यंत विद्यावेतन निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

कार्यक्रमाचे संचालन नवोपक्रम, नवसंशोधन व साहचार्य मंडळाचे व्यवस्थापक अमोल हिरुळकर यांनी, तर आभार सहा आयुक्त डॉ प्रांजली बारस्कर यांनी मानले. याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी डॉ विलास नांदुरकर, संगणक केंद्रप्रमुख डॉ सुहास पाचपांडे, मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद यादव आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page