उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे दुसरे बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलनाचे अमळनेर येथे आयोजन
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने दुसरे बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलन शनिवार दि. ३ फेब्रुवारी रोजी अमळनेरच्या प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात होणार आहे. दि. २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान अमळनेर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार असून या साहित्य संमेलनात सहभागी काही साहित्यिक या विद्यार्थी साहित्य संमेलनात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. अमळनेर येथे विद्यापीठाचे प्रताप तत्त्वज्ञान केंद्र असून या केंद्रात शनिवार दि. ३ फेब्रुवारी रोजी एक दिवसाचे हे विद्यार्थी साहित्य संमेलन होणार आहे. पहिले युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक एैश्वर्य पाटेकर यांच्या हस्ते सकाळी १० वाजता या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी राहतील. दिवसभर चालणा-या या संमेलनात विद्यार्थ्यांचे स्वलिखित काव्यवाचन स्पर्धा, परिसंवाद, बोलीभाषा स्पर्धा असे कार्यक्रम होणार आहेत. एका महाविद्यालयातील ४ विद्यार्थी या संमेलनात सहभागी होवू शकतील. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाकडे महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे नावे पाठविणे आवश्यक आहे.
या संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक झाली. संमेलनासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या बैठकीला प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, नितीन झाल्टे, शिवाजी पाटील, प्रा. एस. टी. भुकन, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, सिनेट सदस्य दिनेश खरात, नितीन ठाकुर, अमोल सोनवणे तसेच प्रा. दिलीप भावसार व विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे उपस्थित होते.