राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उर्दू विभागात पटकथा लेखन कार्यशाळा
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर उर्दू विभागात पटकथा लेखन कार्यशाळा मंगळवार, दिनांक १४ जानेवारी २०२५ रोजी पार पडली. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना पटकथा लिखाणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उर्दू विभाग प्रमुख डॉ संतोष गिऱ्हे यांनी भूषविले. कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून साहित्यकार तथा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग नागपूरचे सेवानिवृत्त संचालक ख्वाजा गुलामूस सैयदैन, साहित्यकार तथा सहायक प्राध्यापक शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय नागपूर येथील बाबर शरीफ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात उर्दू विभाग प्रमुख डॉ संतोष गिऱ्हे यांनी साहित्य आणि सिनेमा या मधील आंतर संबंधाची माहिती देत साहित्यातील अनेक कलाकृतींवर निर्माण झालेल्या चित्रपटांविषयी माहिती दिली.
कथा, पटकथा आणि सिनेमा यांच्यात समन्वयाची गरज याकडेही त्यांनी विशेष लक्ष वेधले. बाबर शरीफ यांनी मार्गदर्शन करताना स्क्रीन प्लेची वैशिष्ट्ये समजावून सांगितली. पटकथा आणि पटकथेचे महत्त्व पटवून देताना अनेक उदाहरणांद्वारे उत्तम साहित्यिक कथा पटकथेच्या रूपाने चित्रपटांमध्ये कशी मांडली जाते हे स्पष्ट केले. जाहिराती आणि त्याचा मानसिक परिणाम कशाप्रकारे होतो याची माहिती देखील त्यांनी दिली. ख्वाजा गुलामूस सैयदैन यांनी आकाशवाणीच्या विविध कार्यक्रमात पटकथेचे महत्व समजावून सांगितले. प्रभावी पटकथेसाठी भाषेचे आणि संवादांचे महत्त्व सांगून पटकथेच्या तंत्रा बाबत माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन डॉ समीर कबीर यांनी केले तर प्रथम सत्राच्या समारोपीय कार्यक्रमाचे आभार गुलफिशा अंजुम यांनी मानले. दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांना पटकथेचा सराव करून देण्यात आला. या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना पटकथेबद्दल बरेच काही समजले आणि शिकता आले. या कार्यशाळेला उर्दू विभागातील शिक्षक डॉ शाइस्ता तबस्सुम, डॉ अस्मत कौसर, डॉ सबीहा खुर्शीद, डॉ सुमैया अफशा, डॉ तरन्नुम नियाज, डॉ महेर यासमीन आणि मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.