शिवाजी विद्यापीठात सुगम्य विज्ञान उपक्रमांतर्गत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
दृष्टी दिव्यांग विद्यार्थी व त्यांच्या विषेश शिक्षकांसाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात कार्यरत असणाऱ्या समावेशी शिक्षण संसाधन केंद्र व युजीसी स्किम फॉर पर्सन व्हिथ डिसॅबिलीटीज् यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. 28 फेब्रुवारी, 2024 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन निमित्ताने दृष्टी दिव्यांग विद्यार्थी व त्यांचे विशेष शिक्षक यांच्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयातील व्हरटयुअल क्लासरूम येथे करण्यात आले. यावेळी या उपक्रमाची सुरूवात अंध विद्यार्थ्यांना उद्यानामध्ये प्रात्यक्षिक दाखवून करण्यात आली यावेळी डॉ. प्रतिभा बी. देसाई, सतीश नवले आणि अंध शाळांचे शिक्षक व दृष्टी दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम सहा तासांचा असून तो दोन टप्प्यांत विभागला गेला. पहिला टप्पा हा चार तासाचा असून यामध्ये जीव, भौतिक, वनस्पती शास्त्रावर आधारित वेगवेगळे प्रयोग वेगवेगळया प्रतिकृतीच्या माध्यमातून सादरीकरण करून शिक्षक, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवले व शिकवले गेले. दुसरा टप्पात प्रयोगांच्या प्रात्यक्षिकासह खुली चर्चा ब्रेल माध्यमातून केली गेली व प्रयोगांचे सादरीकरण दृष्टी दिव्यांग व इतर विद्यार्थी व शिक्षकांसाठी करण्यात आले.
यावेळी समारोप प्रसंगी प्रास्ताविक युजीसी स्किम फॉर पर्सन व्हिथ डिसॅबिलीटीज या योजनेच्या समन्वयिका डॉ प्रतिभा देसाई यांनी केले. कुलगरू आणि प्र-कुलगुरू यांनी प्रदर्शनास भेट दिली व त्यांनी विज्ञान प्रदर्शनाचे विषेश कौतुक केले. यावेळी दृष्टी दिव्यांग विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादरीकरण केले. प्र-कुलगुरू यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले जीवनात येणाऱ्या अडचणींना मात देऊन स्टीफन हॉकिंग सारखे नामवंत शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न पहावे. कुलगुरू म्हणाले अंध विद्यार्थ्यांना विज्ञान विषयातील प्रयोग आजच्या दिवसापुरते मर्यादित न राहता त्यांना कायमस्वरूपी शिकता आले पाहिजेत यासाठी विद्यापीठातील समावेशी शिक्षण संसाधन केंद्र त्यांच्यासाठी पूर्ण वेळ काम करेल आणि विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील सर्व प्रयोग उपलब्ध करून शिकवले जातील असे त्यांनी सांगितले. दृष्टी दिव्यांग विद्यार्थ्यांनी विद्यापीठात पुढील शिक्षण घेऊन मोठया पदावर रूजू व्हावे तसेच त्यांनी विद्यापीठातील दृष्टी दिव्यांग प्राध्यापकांचेही कौतुक केले. तसेच दृष्टी दिव्यांग विद्यार्थ्यांना घेऊन आलेल्या शिक्षकांचे देखील त्यांनी कौतुक केले.
यावेळी प्रकल्प सहाय्यक सतीश नवले यांनी आपले मनोगत मांडले ते म्हणाले विज्ञानाचे नवनवीन प्रयोग दृष्टी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करू असे सांगितले. यावेळी या उपक्रमाचे आभार युवराज मिठारी यांने मानले. यावेळी जिल्हा परिषदेतील विविध शाळेचे दृष्टी दिव्यांग शिक्षक व त्यांच्याबरोबर दृष्टी दिव्यांग विद्यार्थी यांनी प्रदर्शन स्पर्श ज्ञानात्मक प्रयोग पध्दतीने पाहिलेत. प्रदर्शनाच्या नियोजनासाठी राजाराम कॉलेजचे विद्यार्थी जीया जहागीरदार, प्रज्ञा वडर, अंजली तसेच सागर पंडीत, अक्षता बिराजदार यांनी व्हॉलेंटियरस म्हणून काम पाहिले. या विज्ञान प्रदर्शनास मोठया प्रमाणात दृष्टी दिव्यांग शिक्षक व विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली आणि आपल्या प्रतिक्रीया मांडल्या.