सोलापूर विद्यापीठाच्या वतीने स्कूल कनेक्ट अभियानाचा दयानंद महाविद्यालयातून प्रारंभ
कौशल्य व रोजगाराभिमुख शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी प्रगती साधावी – प्र-कुलगुरू प्रा दामा
सोलापूर : नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात आपल्या आवडी व छंदाप्रमाणे शिक्षण घेण्याची संधी असून कौशल्य व रोजगाराभिमुख शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी प्रगती साधावी, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा डॉ लक्ष्मीकांत दामा यांनी केले.
नवीन ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020’ मुळे उच्च शिक्षण व्यवस्थेचे संपूर्ण नूतनीकरण आणि व्यापक बदल होत असल्याने त्याची कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होणाच्या उद्देशाने ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 स्कूल कनेक्ट’ संपर्क अभियान शहर व जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. कुलगुरू प्रा प्रकाश महानवर आणि उच्च शिक्षण विभागाच्या संचालिका डॉ नलिनी टेंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली याचा शुभारंभ मंगळवारी दयानंद शिक्षण संस्था येथून प्र-कुलगुरू प्रा दामा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे संचालक प्रा डॉ गौतम कांबळे यांच्यासह दयानंद शिक्षण संस्थेचे प्रशासक प्राचार्य डॉ विजय उबाळे, प्राचार्य डॉ बी एस दामजी, प्राचार्य डॉ शिवाजी शिंदे, प्राचार्य डॉ क्षीरसागर, प्राचार्य डॉ गायकवाड, दयानंद असावा प्रशालेचे मुख्याध्यापक प्रा पवार आदी उपस्थित होते.
यावेळी प्र-कुलगुरू प्रा दामा यांनी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा आढावा घेत शिक्षण क्षेत्रातील बदलाची माहिती दिली. विद्यार्थ्यांची क्रेडिट बँक, कौशल्य विकास कोर्सेस आणि दरवर्षी मिळणारे विविध प्रमाणपत्र आणि आव्हाने पेलण्यासाठी या नव्या शिक्षण धोरणात चांगले बदल करण्यात आले आहेत. निश्चितच याचा प्रगतीसाठी फायदा होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. डॉ गौतम कांबळे यांनी जगातील शिक्षण व्यवस्थेची माहिती देत नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची वैशिष्ट्ये सांगितले.