सोलापूर विद्यापीठात स्कूल कनेक्ट अभियानाचा समारोप
राष्ट्रीय शिक्षण धोरण राबविण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची – डॉ. साठे
सोलापूर : पुढील शैक्षणिक वर्षांमध्ये सर्व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण राबविण्यासाठी शिक्षकांची भूमिका ही फार महत्त्वाचे राहणार असल्याचे प्रतिपादन बीएमसीसी कॉलेज, पुणे येथील डॉ. प्रशांत साठे यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये आयक्यूएसी विभागाच्यावतीने आयोजित एनईपी-स्कूल कनेक्ट अभियानाचा समारोप कार्यक्रम डॉ. साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा हे होते. यावेळी आयक्यूएसी विभागाचे संचालक प्रा. डॉ. गौतम कांबळे यांनी प्रास्ताविकात दि. 16 ते 31 जानेवारी दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून राबविण्यात आलेल्या एनईपी-स्कूल कनेक्ट अभियानाची माहिती दिली. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
डॉ. साठे म्हणाले की, केंद्र सरकारने 2020 मध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणले. सुरुवातीला त्याची अंमलबजावणी विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि स्वायत्त महाविद्यालयांमध्ये करण्यात येत आहे. पुढील शैक्षणिक वर्षांपासून पदवीसाठी सर्व महाविद्यालयांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार आहे. यासाठी शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची राहणार आहे. विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे होणाऱ्या बदलांची, फायद्यांची माहिती सकारात्मक पद्धतीने सांगणे आवश्यक आहे. त्याचबरोबर चांगल्याप्रकारे नवीन शैक्षणिक धोरण राबवणे, हे शिक्षकांचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सुरुवातीला एनईपी घरोघरी हा उपक्रम राबविण्यात आला. त्यानंतर स्कूल कनेक्ट अभियान देखील यशस्वीपणे राबविण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार उपकुलसचिव डॉ. उमराव मेटकरी यांनी मानले.