गोंडवाना विद्यापीठात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या योगदानामुळेच महिला प्रगतीपथावर – प्रा डॉ नरेंद्र आरेकर
गडचिरोली : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक योगदानामुळेच आज विविध क्षेत्रांमध्ये महिला प्रगतीपथावर दिसत आहेत, असे मत प्रा डॉ नरेंद्र आरेकर यांनी व्यक्त केले. गोंडवाना विद्यापीठामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केंद्राच्यावतीने सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदान या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ संजय गोरे, गुरुदास कामडी, मानव्य विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ श्याम खंडारे, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालिका डॉ अनिता लोखंडे, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केंद्राच्या समन्वयक प्रा डॉ रजनी वाढई उपस्थित होते.
डॉ आरेकर म्हणाले, सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक व शैक्षणिक योगदान आपण कधीच विसरू शकत नाही. त्यांनी सामाजिक परिवर्तनासाठी केलेल्या त्यागाची भरपाई आपण कधीच करू शकणार नाही. सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांचे स्मरण समस्त मानव जातीला जगण्याची प्रेरणा देत राहील. महान व्यक्तींना समजून घेण्यासाठी त्यांच्या साहित्याचे सखोल वाचन करणे आवश्यक आहे.
सावित्रीबाई जयंतीनिमित्त आयोजित निबंध स्पर्धेमधील साहिल झाडे यांना प्रथम, गणपती गज्जेला द्वितीय तर सुनीता बाबुराव पेंदोर व स्नेहा विलास बनपूरकर यांना संयुक्तपणे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
प्रास्ताविक डॉ रजनी वाढई यांनी केले. सूत्रसंचालन डॉ धैर्यशील खामकर यांनी केले तर आभार डॉ सुषमा बनकर यांनी मानले. यावेळी प्राध्यापक, निमंत्रित, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी कुलगुरु डॉ प्रशान्त बोकारे, प्र-कुलगुरु डॉ श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ अनिल हिरेखण यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.