अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे स्त्री शक्तीचा सन्मान – डॉ अर्चना हनवंते
अमरावती : समाजामध्ये स्त्रियांचा आदर व त्यांची प्रतिष्ठा राखणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. यामुळे सामाजिक एकात्मता निर्माण होण्यास मदत होईल. सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांच्या विकासासाठी दिलेला लढा आणि त्यांच्या कार्याची महत्ता खरोखरच आदर्शवादी स्वरूपाची आहे. त्यांच्या या कार्यामुळे आज प्रत्येक क्षेत्रातील महिलांना समान वागणूक आणि प्रतिष्ठेचे स्थान मिळाले असून, महिलांचे अस्तित्व सर्वच क्षेत्रांमध्ये दृढपणे उभे आहे. सावित्रीबाईंनी स्त्रियांच्या हक्कासाठी दिलेले योगदान आजच्या युगातील महिलांसाठी प्रेरणादायी व सन्मानाचे असल्याचे मत डॉ अर्चना हनवंते यांनी व्यक्त केले.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाद्वारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख वक्ता म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागाचे संचालक डॉ श्रीकांत पाटील उपस्थित होते.
महाराष्ट्रातील अग्रगण्य समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांनी जात, लिंग भेदभाव आणि अन्यायाविरुद्ध लढा दिला. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी महिलांसाठी शैक्षणिक कार्य केले. महिलांना विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मिळवून दिला. सावित्रीबाईंचे विचार व कार्य समाजामध्ये प्रचारित होणे अत्यंत आवश्यक आहे, असे डॉ हनवंते यांनी याप्रसंगी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात डॉ श्रीकांत पाटील म्हणाले, “समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी अशा थोर महापुरुषांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी तसेच समाजातील प्रत्येक घटकांनी घेणे आवश्यक आहे. यामुळे सावित्रीबाईंच्या कार्याला उजाळा मिळण्यास मदत होईल.” ते पुढे म्हणाले की, “विद्यापीठामध्ये विविध थोर महापुरुषांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केल्याने विद्यार्थ्यांमध्ये मूल्य, संस्कार आणि विनम्रता निर्माण होण्यास मदत होते.”
कार्यक्रमाला विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा प्रियंका तायडे यांनी केले, तर आभार प्रा शिवानी अग्रवाल यांनी मानले.