नागपूर विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र संकुलात सावित्रीबाई फुले जयंती साजरी
फुले दाम्पत्याने मानवजातीला आत्मोन्नयाचा मार्ग दिला
मराठी विभाग प्रमुख डॉ शैलेंद्र लेंडे यांचे प्रतिपादन
नागपूर : ‘महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केवळ विद्यार्जनाचे महत्त्वच पटवून दिले नाही तर एकूणच रुढीपरंपरावादी विचारप्रवाहाला छेद देत विद्येच्या माध्यमातून आत्मोन्नयाचा मार्ग समुच्च मानवजातीला दिला’, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ शैलेंद्र लेंडे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र संकुलात शुक्रवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
जयंती सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ शैलेंद्र लेंडे यांच्यासह राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ विकास जांभूळकर, लोकप्रशासन विभागप्रमुख डॉ जितेंद्र वासनिक यांची उपस्थिती होती. यावेळी संबोधित करताना डॉ शैलेंद्र लेंडे यांनी फुले दाम्पत्याच्या जीवनकार्याला उजाळा दिला. राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ विकास जांभूळकर यांनी फुले दाम्पत्याचे कार्य केवळ स्त्रीमुक्तीच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर स्त्रियांच्या आत्मसन्मानाच्या कक्षा रुंदावणारे असल्याचे सांगितले.
डॉ जितेंद्र वासनिक यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. अभिवादन सोहळ्याला मानव्य शास्त्र संकुलात विविध पदव्युत्तर विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी तसेच कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.