‘नर्मदा बचाव आंदोलना’च्या ३५ वर्षांचा आढावा घेणारा माहितीपट ‘लकीर के इस तरफ’ चे शनिवारी प्रदर्शन
छत्रपती संभाजीनगर : यशवंतराव चव्हाण सेंटर, एमजीएम वृत्तपत्रविद्या व जनसंवाद महाविद्यालय व एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्टस् यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट चावडीचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमांतर्गत ‘नर्मदा बचाव आंदोलना’च्या ३५ वर्षांचा आढावा घेणारा ‘लकीर के इस तरफ’ चित्रपटाच्या विशेष शोचे आmgmयोजन शनिवार, दि. ३० नोव्हेंबर २०२४ रोजी सायं. ६ वा. एमजीएम येथील व्ही. शांताराम प्रेक्षागृहात करण्यात आले आहे. यावेळी या माहितीपटाच्या दिग्दर्शिका शिल्पा बल्लाळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
‘नर्मदा बचाव आंदोलना’च्या ३५ वर्षांचा आढावा घेणारा माहितीपट म्हणजे – लकीर के इस तरफ. ९० मिनिटांच्या या माहितीपटात, आंदोलनाचं यश-अपयश याची मांडणी तर आहेच, पण त्यापेक्षा मनात भरतात त्या आंदोलनानं सुरू केलेल्या आदिवासी मुलांसाठीच्या, नर्मदेच्या कुशीतल्या जीवनशाळा!!! लडाई – पढाई साथ साथ म्हणत, संघर्ष आणि निर्माण एकत्र कसं साधायचं याचा वास्तूपाठ यात आहे.
महाराष्ट्र शासनाच्या समाजशास्त्र विषयाच्या पुस्तकात, लकीर के इस तरफ या माहितीपटाचा उल्लेख केला आहे. सामाजिक चळवळी या प्रकरणात संदर्भ म्हणून विद्यार्थ्यांना ही फिल्म सुचवली गेली आहे. चित्रपट प्रदर्शनानंतर दिग्दर्शिका शिल्पा बल्लाळ उपस्थितांशी संवाद साधणार आहे.
प्रवेश सर्वांसाठी खुला असून जास्तीत जास्त रसिक, विद्यार्थी, अभ्यासक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.