सोलापूर विद्यापीठातर्फे कॉ प्रभाकर यादव व्याख्यानमालेतंर्गत शनिवारी सोलापुरात सतीश मराठे यांचे व्याख्यान
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने कॉ प्रभाकर यादव व्याख्यानमालेतंर्गत शनिवार, दि 4 जानेवारी 2025 रोजी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृह (ॲम्पी थिएटर) येथे सायंकाळी 5:30 वाजता रिझर्व बँकेचे संचालक सतीश मराठे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आल्याची माहिती कुलसचिव योगिनी घारे यांनी दिली.
‘भारत-बदलते अर्थकारण’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा डॉ प्रकाश महानवर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार असून यावेळी प्र-कुलगुरू प्रा डॉ लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबादचे चेअरमन देविदास तुळजापूरकर, जनरल सेक्रेटरी धनंजय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दरवर्षी कॉ प्रभाकर यादव व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. या व्याख्यानमालेचा मुख्य उद्देश विकसनशील अर्थव्यवस्थेत वित्तीय संस्थांची भूमिका या विषयावर भर देणे, हा आहे. या व्याख्यानमालेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला बँकेच्या व्यावहारांची माहिती व्हावी, या हेतूने विविध विषयांवर प्रबोधन केले जाते. याआधी या व्याख्यानमालेत डॉ भालचंद्र कांगो, योगेंद्र यादव, कुमार केतकर, गिरीश कुबेर यासारख्या विचारवंतांनी आपले प्रबोधनात्मक विचार मांडले आहेत.
तरी या व्याख्यानमालेचा विद्यार्थी, शिक्षक, नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक वाणिज्य व व्यवस्थापन संकुलाचे संचालक डॉ राजीवकुमार मेतें, समन्वयक डॉ वनिता सावंत, डॉ रश्मी दातार यांनी केले आहे.