गोंडवाना विद्यापीठात संत तुकाराम महाराज प्रबोधन शिबिराचे आयोजन
गडचिरोली : संत तुकाराम महाराज यांच्या युगप्रवर्तक सामाजिक प्रबोधन कार्याचे नवीन पिढीत संक्रमण करण्यासाठी जगद्गुरू संत तुकाराम अध्यासन केंद्राच्या वतीने शनिवार, दि 17 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता एक दिवसीय प्रबोधन शिबिराचे आयोजन गोंडवाना विद्यापीठ सभागृहात करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रम कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून प्रबोधन शिबीराला प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ अनिल हिरेखन तसेच मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ धनराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
त्यासोबतच, प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्राचे प्रमुख तथा मराठी विभागप्रमुख डॉ नंदकुमार मोरे, यवतमाळ येथील सुप्रसिद्ध लेखक डॉ अशोक राणा आणि नागपूर येथील प्रसिद्ध प्रवचनकार अशोक स्वरस्वती तसेच समारोपीय सत्राचे प्रमुख अतिथी म्हणून नवी दिल्ली येथील साहित्य अकादमीचे सदस्य डॉ प्रमोद मुनघाटे उपस्थित राहणार आहेत.
सदर एक दिवसीय प्रबोधन शिबिर तीन सत्रात पार पडणार आहे. पहिल्या सत्रात प्रमुख वक्ता म्हणून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील मराठी विभाग प्रमुख व संत तुकाराम अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ नंदकुमार मोरे यांचे “संत तुकाराम महाराजांची समकालीन प्रस्तुतता” या विषयावर मार्गदर्शन लाभणार आहे. दुसऱ्या सत्रात यवतमाळ येथील सुप्रसिद्ध संशोधक व लेखक डॉ अशोक राणा यांचे “संत तुकाराम महाराज आणि वैदर्भी संत परंपरा” या विषयावर मार्गदर्शन तर तिसऱ्या सत्रात नागपूर येथील प्रसिद्ध प्रवचनकार अशोक स्वरस्वती यांचे “वारकरी संत परंपरेतील प्रवचन शैली” या विषयावर मार्गदर्शन लाभणार आहे.
तरी, सदर प्रबोधन शिबीराचा लाभ सामान्य नागरीक, विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, प्राध्यापकांनी घ्यावा, असे आवाहन जगद्गुरू संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ हेमराज निखाडे यांनी केले आहे.