विश्व विद्यापीठ स्पर्धेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पूर्वशाला रजत पदक
विद्यापीठाचा गौरव आंतरराष्ट्रीय स्तरावर – कुलगुरुंचे गौरवोद्गार
अमरावती : चेंगडू (चीन) या शहरामध्ये सध्या फिसू या विश्व शिखर संस्थेद्वारे आयोजित वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स या स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेमध्ये भारतीय विद्यापीठ संघाच्या धनुर्विद्या मुलींच्या संघामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुमारी पूर्वशा सुधीर शेंडे या विद्यार्थिनीचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये कंपाउंड राउंड सांघिक स्पर्धा या प्रकारामध्ये भारतीय विद्यापीठ संघाच्या चमुने अमेरिका आणि चीन या दोन देशांच्या विद्यापीठ संघाना अनुक्रमे 231-225, 229-224 अशा गुण फरकाने पराभूत करून सर्वांना चकित केले. सुवर्ण पदकाकरिता दक्षिण कोरिया या संघासोबत भारतीय विद्यापीठ संघाचा सामना होता. मात्र या सामन्यात भारतीय विद्यापीठ संघाला दक्षिण कोरिया विद्यापीठ संघाकडून 224- 229 अशा थोड्या गुण फरकाने मात स्वीकारावी लागली. परंतु भारतीय विद्यापीठ संघाने मात्र या स्पर्धेत रजत पदक प्राप्त केले. रजत पदक प्राप्त करणाऱ्या भारतीय विद्यापीठ संघात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या खेळाडूचा समावेश असणे ही बाब विद्यापीठासाठी अतिशय गौरवाची असल्याने कु. पूर्वशा हीचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र. कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, क्रीडा संचालक डॉ. अविनाश असनारे यांचेसह सर्व प्राधिकारी सदस्यांनी अभिनंदन केले.
पुर्वशा ही स्थानिक केशरबाई लाहोटी महाविद्यालयाची खेळाडू असून या महाविद्यालयाचे प्राचार्य, क्रीडा संचालक आणि व्यवस्थापनाचे सोबत पालकांचे देखील कुलगुरू यांनी विशेष अभिनंदन केले. याच स्पर्धेत पुरुषांच्या संघात डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या यशदिप संजय भोगे या विद्यार्थ्याचा समावेश होता. या संघाला मात्र चतुर्थ स्थानावर समाधान मानावे लागले. एकाच वर्षात विद्यापीठाच्या दोन खेळाडूंचा विश्व विद्यापीठ स्पर्धेत सहभाग असणे ही बाब विद्यापीठासाठी भूषणावह आहे. या गौरवामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाचा नावलौकिक खेळाडूंनी पोहोचविला असे गौरवोद्गार कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी काढले.