संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठचे डॉ. संतोष राऊत यांना हॉवर्ड विद्यापीठाची फेलोशिप प्राप्त
अमरावती : लंडनमधील हॉवर्ड विद्यापीठाची पोस्ट डॉक्टरल फेलोशिप प्राप्त करणारे डॉ. संतोष राऊत यांचा मंगळवार दि. 22 ऑगस्ट, 2023 रोजी विद्यापीठात संचालक डॉ. श्रीकांत पाटील व जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी सत्कार केला. विद्यापीठाच्या अधिसभागृह येथे हा सत्कार समारंभ पार पडला. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील होते. सत्काराला उत्तर देतांना डॉ. राऊत म्हणाले, स्वतंत्र विचार करणे हाच शिक्षणाचा पाया आहे. शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे साधन आहे. संत गाडगे बाबा ख-या अर्थाने शिक्षकच होते असे सांगून अनुभवातूनच ज्ञानाची निर्मिती होत असल्याचे ते म्हणाले. संत गाडगे बाबांच्या किर्तनाचे उदाहरण देतांना डॉ. राऊत यांनी सांगितले, की संत गाडगे बाबा किर्तन सुरू असतांना उपस्थितांना म्हणाले, तुम्ही देव पाहिला का? आणि कोप-यात बसलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे अंगुली निर्देश करीत त्यांनी तो तिथे देव बसला असल्याचे गाडगे बाबांनी म्हटले. डॉ. राऊत पुढे म्हणाले, केवळ पुस्तकापर्यंत ज्ञान मर्यादीत ठेवू नका. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजसुधारणांसाठी केला. संतांनी कुठलेही शिक्षण घेतले नव्हते, पी.एच.डी. प्राप्त केली नव्हती, परंतु तरीही त्यांनी शिक्षण दिले. ते म्हणाले, गुणवत्ता प्राप्त करावयाची असेल, तर प्रामाणिकता, स्वतंत्र विचार करणे आणि नि:स्वार्थपणा हे तीन गुण महत्वाचे आहेत.
डॉ. श्रीकांत पाटील म्हणाले, संशोधन करावयाचे असेल, तर आधी माहिती मिळवावी लागेल. त्याचबरोबर प्रेरणा देखील आवश्यक असते. डॉ. संतोष राऊत यांना जगप्रसिध्द हॉवर्ड विद्यापीठाची फेलोशिप मिळाली, तशीच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील प्राध्यापकांनाही ती मिळाली पाहिजे, असे सांगून कौन्सिलिंग करतांना कसे वर्तन असावे व त्यासाठी शांतीचा मार्ग काढण्याचे आजीवन अध्ययन व विस्तार विभागाकडून प्रयत्न केले जातील असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन आदित्य पुंड यांनी, तर आभार डॉ. प्रशांत भगत यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभाग प्रमुख, अधिकारी, शिक्षक, डॉ. चेतन राऊत, डॉ. संजय खडसे, कर्मचारी, विद्यार्थी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.