संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागात रक्तदान शिबीर संपन्न
रक्तदानासह अवयवदान जनजागृती व्हावी – कुलगुरू डॉ मिलींद बारहाते
अमरावती : रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असून रक्तदानासह अवयवदानाची जनजागृती सर्वसामान्यांमध्ये व्हावी, विद्यापीठाचे विद्यार्थी हे जनजागृतीकरीता पुढाकार घेतील, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी केले. प्राणीशास्त्र विभाग व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन प्राणीशास्त्र विभागाच्या सभागृहात करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दिलीप सौंदळे, माजी प्र-कुलगुरू डॉ प्रसाद वाडेगावकर, प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ एच बी नांदुरकर, आरोग्य अधिकारी डॉ स्मिता थोरात व रक्तदान केंद्राचे जनसंपर्क अधिकारी डॉ मिलींद तायडे व्यासपीठावर उपस्थित होते.
कुलगुरू पुढे म्हणाले, समाजाला आपण देणे लागतो ही भावना सर्वांमध्ये निर्माण झाली पाहिजे. त्याकरीता मोठ्या प्रमाणावर जनजागृती व्हायला हवी. रक्तदानाचे अऩेक फायदे आहेत. महत्वाचे म्हणजे गरजूंचे प्राण त्यामुळे वाचू शकतात. आपल्या दानातून गरजूला जेव्हा फायदा होतो, त्यावेळेला प्रत्येकाला आनंद झालेला असतो. दर चार महिन्यानंतर प्रत्येकाने रक्तदान करावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. रक्तदानाबरोबरच अवयवदानाचे महत्व व श्रेष्ठत्व तेवढेच आहे. रक्तदानासह अवयवदानाचे महत्व सर्वांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी विद्याथ्र्यांनी स्वीकारावी असेही ते म्हणाले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दिलीप सौंदळे म्हणाले, अमरावतीत शासकीय रक्तपेढीसह तीन खाजगी रक्तपेढ्या आहेत. मेळघाटमध्ये सुध्दा रक्तपेढी सुरू होणार आहे. सिकलसेल, अॅनेमिया, पॅलेसिनिया या रुग्णांना रक्ताची अधिक गरज भासते. रिप्लेसमेंटदाता मिळत नसल्यामुळे रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आमच्या पेढीत रक्त जमा केले जाते. गरजूंना रक्त उपलब्ध व्हावे, याकरीता सर्वांनी शिबिरामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन करतांना ते पुढे म्हणाले, आपला वाढदिवस तसेच लग्न वाढदिवसाला सुध्दा रक्तदान करु शकता.कुठल्याच प्रयोगशाळेत रक्त तयार होत नसल्यामुळे दात्यांनी रक्तदान करणे आवश्यक आहे, ही संधी प्रत्येकाने घ्यावी, असे ते म्हणाले. याप्रसंगी मिलींद तायडे यांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले.
29 दात्यांनी केले रक्तदान
यावेळी रक्तदान शिबिरामध्ये माजी प्र-कुलगुरू डॉ प्रसाद वाडेगावकर, विभागप्रमुखांमध्ये डॉ संदीप वाघुळे, डॉ विलास नांदुरकर, डॉ प्रशांत शिंग्वेकर, डॉ विनय नागले यांचेसह विद्यापीठातील अधिकारी, शिक्षक, कर्मचारी तसेच विविध विभागातील 29 विद्यार्थ्यां नी शिबिरात भाग घेऊन मोठ्या प्रमाणावर रक्तदान केले.
फित कापून कुलुगुरुंच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. दीपप्रज्वलन, महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संचालन रसिका काळे यांनी, तर आभार डॉ विनय नागले यांनी मानले. कार्यक्रमाला राजेश पिदडी यांचेसह विभागातील वैद्यकीय अधिकारी, रक्तकोषचे कर्मचारी, प्राणीशास्त्र विभागातील विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.