अमरावती विद्यापीठात संगीतसूर्य केशवराव भोसले जन्मशताब्धी सोहळा साजरा
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील प्रादर्शिक कला विभागाच्या नृत्य, नाटक आणि रंगभूमी विभागात संगीतसूर्य केशवराव भोसले जन्मशताब्दी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ रंगकर्मी व संत गाडगे बाबा अध्यासनाचे माजी समन्वयक प्रा एम टी नाना देशमुख, उद्घाटक म्हणून आंतर विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ वैशाली गुडधे, विभागाचे समन्वयक डॉ भोजराज चौधरी, संत गाडगेबाबा अध्यासनाचे समन्वयक डॉ दिलीप काळे, व्याख्याते म्हणून अॅड आशिष हाळके, डॉ राजेश उमाळे उपस्थित होते.
डॉ वैशाली गुडधे यांनी उद्घाटन झाल्याची रितसर घोषणा केली. व्याख्याते अॅड हाळके ‘संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे व्यक्तित्व आणि कर्तृत्व’ या विषयावर व्याख्यान देतांना म्हणाले, अत्यंत कमी वयात संगीतसूर्यांनी नाट्य रसिकांच्या मनावर अमिप छाप सोडली. संवाद आणि संदेश, व्यवस्थापन आणि रंगमंचावरील वावर, भावना, कल्पना, संवेदना व्यक्त होत असताना त्या कलेच्या माध्यमातून किती समर्थपणे मांडता येऊ शकतात यांचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे संगीतसूर्य केशवराव भोसले होय.
सत्य आणि नाटक जाणून घेण्यासाठी कलावंत सोबत बसणे, एखादे नाटक बघणे, वाद्य वाजविणे, नृत्य बघणे अशा विविध गोष्टीतून आपल्याला कलावंतांच्या विविध भावना, हावभावातून त्यांच्या संवेदना समजून येतील. केशवरावांचे सादरीकरण, साधना, प्रशासन, मानसिकता, शिस्त या गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्व अभ्यासताना आपल्याला दिसून येतात. केशवराव भोसले यांनीच रंगमंचावर पहिल्यांदा मखमलीचा पडदा आणला. स्त्री भूमिका साकारल्यात, अवघ्या दहाव्या वर्षी त्यांनी संगीत शारदा नाटकामध्ये शारदेची भूमिका केली. त्यांनी जे पद गायिले त्यामध्ये ‘मूर्तिमंत भीती उभी, मजसमोर राहिली’ या पदाला आठ वेळा वन्समोर मिळाला.
ते एक स्त्री भूमिका करणारे अद्वितीय कलावंत होते. वयाच्या 32 व्या वर्षापर्यंत त्यांची नाट्यसृष्टीतील कारकीर्द अशीच सुरू राहिली, वीर वामनराव जोशी यांनी ‘राक्षसी महत्वकांक्षा’ या नाटकाचा प्रयोग करून इंग्रजी सत्तेला हादरवले होते. परंतु वीर वामनराव जोशी यांना आपल्या नाट्यमंडळीत स्थान देऊन त्यांना सहकार्य केले, त्यांच्या पाठीशी उभे राहिले, हे त्यांचे कर्तृत्व वाखाणण्याजोगे आहे.
प्रा एम टी नाना देशमुख यांनी याप्रसंगी कलावंतांना मार्गदर्शन करतांना अशा प्रकारचे कार्यक्रम विभागात नेहमी व्हावे, जेणेकरून विद्यार्थ्यांना विविध कलावंतांची माहिती मिळल असे सांगून त्यांनी संत गाडगे बाबांची कीर्तनशैली आणि त्यांचा अभिनय देखील करून दाखविला. कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ सतीश पावडे लिखित ‘पायोनियर ऑफ मॉडर्न इंडियन म्युझिकल थिएटर’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी संगीतसूर्य केशवराव भोसले राष्ट्रीय सांस्कृतिक परिषद रौप्य महोत्सवी वर्षाचे उद्घाटन देखील मान्यवरांच्या हस्ते पार पडले. संगीतसूर्य केशवराव भोसले राष्ट्रीय परिषदेच्या कार्यकारिणीवर नृत्य विभागाच्या प्रमुखपदी मंजुषा ठाकरे व नाट्य विभागाच्या प्रमुख पदी पल्लवी यादगिरे (वैद्य) यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रीय समन्वयक म्हणून डॉ भोजराज चौधरी यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला. यावेळी नाट्यगीत गायन, संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या तैलचित्राचे अनावरण, ग्रंथ प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजन व नांदी गायनाने झाली. प्रसिध्द गायक डॉ राजेश उमाळे यांच्या सुमधुर आवाजात विद्यार्थ्यांनी समूह नांदी गायन केले. प्रास्ताविकातून विभागाचे समन्वयक डॉ भोजराज चौधरी समन्वयक यांनी पाहुण्यांना विभागाची माहिती दिली. सूत्रसंचालन रेणुका बोधनकर यांनी केले. यावेळी विभागातील शिक्षकवृंद डॉ मनोज उज्जैनकर, डॉ राहुल हळदे, रेणुका बोधनकर, अमोल पानबुडे, राजेश बोडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी राजू इंगोले, गणेश कोंडे, प्रथम तथा द्वितीय वर्षाचे सर्व विद्यार्थी, संस्कृत विभाग, योगा विभाग, पाली बुद्धिझम विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते. डॉ राजेश उमाळे यांनी गायिलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या नाटकातील विविध नाट्यपदाने सोहळ्याची सांगता झाली.