विश्वकर्मा विद्यापीठात ‘सम्यक’ – मध्यस्थी आणि लवाद केंद्राचा शुभारंभ : पर्यायी विवाद निराकरणाला चालना देण्यासाठी कटिबद्ध
पुणे : भारत सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि विकसित भारत २०४७ या दृष्टीकोनाशी सुसंगतपणे वाटचाल करत असताना विश्वकर्मा विद्यापीठाने बुधवार दि १९ मार्च रोजी ‘सम्यक- मध्यस्थी आणि लवाद केंद्रा’चा शुभारंभ केला. या केंद्राचा उद्देश पर्यायी विवाद निराकरण यंत्रणेला प्रोत्साहन देणे आणि विवाद सौहार्दपूर्ण व कार्यक्षम पद्धतीने सोडवण्यासाठी व्यावसायिक मंच उपलब्ध करून देणे हा आहे.

विश्वकर्मा विद्यापीठात झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ लवादकार निशिकांत देशपांडे यांनी या केंद्राचे उदघाटन केले. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा डॉ सिद्धार्थ जबडे, उपाध्यक्ष प्रा डॉ वासुदेव गाडे उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना निशिकांत देशपांडे यांनी न्यायालयीन प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्यासाठी पर्यायी वाद निराकरण प्रक्रियेचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “आपण वैकल्पिक विवाद निवारण क्षेत्रातील क्रांतीच्या उंबरठ्यावर उभे आहोत आणि विश्वकर्मा विद्यापीठाच्या मध्यस्थीकरण केंद्रासाठी घेतलेला पुढाकार हा काळानुरूप आणि कौतुकास पात्र आहे.”
कुलगुरू प्रा डॉ सिद्धार्थ जबडे यांनी भारताच्या भविष्यातील विकासात विद्यापीठाची भूमिका अधोरेखित केली. ते म्हणाले, “अशा केंद्रांमुळे विविध क्षेत्रातील निपुणता एकत्र येते. त्यामुळे आपण केवळ विधी शिक्षण नव्हे तर आंतरशाखीय क्षेत्रांतही कालसुसंगत, गतिमान राहू शकतो.”
‘सम्यक’ केंद्राच्या माध्यमातून विश्वकर्मा विद्यापीठ ‘विकसित भारत २०४७’ या दृष्टिकोनाशी सुसंगत राहून भारताच्या स्वातंत्र्य शताब्दीपर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याच्या धेय्यामध्ये योगदान देणार आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव व व्यावहारिक शिक्षण मिळावे यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. त्या माध्यमातून ते या परिवर्तन प्रक्रियेत सक्रिय योगदान देऊ शकतील.
‘सम्यक’ हे केंद्र व्यावसायिक, रिअल इस्टेट आणि आरोग्य क्षेत्र संबंधित विवादांच्या निराकरणासाठी विद्यापीठाच्या तज्ज्ञतेचा उपयोग करेल. अनुभवी तज्ज्ञांच्या सहकार्याने संस्थात्मक मध्यस्थी आणि लवाद सेवा प्रदान केली जाईल. आधुनिक पायाभूत सुविधा आणि प्रशासनिक पाठबळासह सदरील केंद्रामार्फत कार्यक्षम व पारदर्शक पद्धतीने विवाद निराकरण सेवा देण्यात येतील.
याबरोबर, हे केंद्र विधी विद्यार्थ्यांसाठी एक व्यासपीठ म्हणून काम करेल. पर्यायी वाद निवारण क्षेत्रातील वाढती मागणी लक्षात घेऊन, विद्यार्थ्यांना मध्यस्थी आणि लवाद प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल.
यापूर्वी, १० मार्च रोजी अध्यक्ष भरत अगरवाल यांच्या हस्ते केंद्राच्या अधिकृत बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले होते.
‘सम्यक’च्या स्थापनेद्वारे विश्वकर्मा विद्यापीठाने विधी शिक्षणातील नावीन्य आणि पर्यायी विवाद निराकरणाला चालना देण्याची बांधिलकी व्यक्त केली आहे. हे केंद्र राष्ट्रीय धोरणे आणि जागतिक सर्वोत्तम पद्धतींशी सुसंगत राहील.