भारती विद्यापीठात डॉ पतंगराव कदम यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
आव्हानांचा सामना करण्यासाठी विद्यापीठांनी सज्ज व्हावे – डॉ. विवेक सावजी
पुणे : तंत्रज्ञानात झपाट्याने होणारे क्रांतिकारी बदल, जागतिक स्पर्धेचे बदलते रूप, विद्यार्थी आणि पालकांची बदलती मानसिकता, गोष्टी कालबाह्य होण्याचा वाढलेला वेग या व अशा अनेक आव्हानांचा सामना करण्यासाठी विद्यापीठांनी सज्ज व्हावे असे मत भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांनी व्यक्त केले. भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त मध्यवर्ती कार्यालयात आयोजित अभिवादन कार्यक्रमात ‘ विचारभारती ‘ च्या डॉ. पतंगराव कदम विशेषांकाचे प्रकाशन करताना ते बोलत होते. यावेळी सहकार्यवाह व. भा. म्हेत्रे, डॉ. एम. एस. सगरे, कुलसचिव जी जयकुमार, विचार भारतीचे संपादक प्रा. मिलिंद जोशी, भारती सहकारी बँकेचे चेअरमन बी. बी. कड, वसंतराव माने, परीक्षा विभागाचे नियंत्रक अँथनी रोज उपस्थित होते.
डॉ. सावजी म्हणाले, जिद्द आणि महत्वाकांक्षा याच्या बळावर डॉ. पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठाच्या प्रगतीचा आलेख कायम उंचावत ठेवला.
प्रा. जोशी म्हणाले, ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी ज्या दिव्यातून जावे लागते ते डॉ. पतंगराव कदम यांनी अनुभवले होते. जे आपल्या वाट्याला आले ते पुढच्या पिढ्यांच्या वाट्याला येऊ नये यासाठी आणि शिक्षणाची गंगा बहुजन समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत नेण्यासाठी त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली. भारती विद्यापीठाने गेल्या साठ वर्षात देशाच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विकासात दिलेले योगदान मोलाचे आहे. डॉ. कदम यांनी केवळ संस्था उभ्या केल्या नाहीत तर माणसे उभी केली. डॉ. आप्पासाहेब पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
भारती विद्यापीठाच्या धनकवडी आणि एरंडवणे शैक्षणिक संकुलात प्राचार्य, प्राध्यापक, अधिकारी वर्ग व शिक्षकेतर सेवक यांनी डॉ. पतंगराव कदम यांना अभिवादन केले.