राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सेवानिवृत्त शिक्षक, कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ संपन्न
सकारात्मक राहणे हेच जीवन – डॉ संजय दुधे
नागपूर : सकारात्मक राहणे हेच जीवन असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ संजय दुधे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात शनिवार, दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ रोजी पार पडला. या कार्यक्रमात डॉ दुधे मार्गदर्शन करीत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्र-कुलगुरु डॉ संजय दुधे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून कुलसचिव डॉ राजू हिवसे, वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. जीवन सुंदर असून त्याकडे नकारात्मक दृष्टीने न पाहता सकारात्मक दृष्टीने पाहण्याचे आवाहन डॉ दुधे यांनी पुढे बोलताना केले. जीवनामध्ये जीवनमूल्य सामाजिक मूल्यांना अधिक महत्त्व असल्याचे सांगत सेवानिवृत्तीनंतर भरपूर वेळ मिळणार असून आरोग्याकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये सेवानिवृत्त झालेले सत्कारमूर्ती विद्युत परमाणु व संगणकशास्त्र विभागातील माजी विभाग प्रमुख डॉ सतीश जगन्नाथ शर्मा, पदव्युत्तर शिक्षण विभागातील सहाय्यक प्राध्यापक रेणू विजय बायस्कर, लेखा विभागातील सहाय्यक कुलसचिव मनोज मनोहर जोशी, सामान्य परीक्षा विभागातील विजया रामकृष्ण ठाकरे, अभियांत्रिकी विभागातील अभियंता नितीन वसंत विश्वकार, डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातील दप्तरी छाया महादेव राऊत व विद्या विभागातील किशोर कृष्णाजी लोणारे यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह व धनादेश देत सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन करीत आभार दीपक घोडमारे यांनी मानले.