राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा १५ ऑक्टोंबर पासून

परीक्षा संचालनात दक्षता बाळगा – डॉ संजय कवीश्वर 

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या हिवाळी २०२४ परीक्षेस मंगळवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ पासून सुरुवात होत आहे. हिवाळी परीक्षेबाबत प्राचार्य व केंद्राधिकारी यांची पूर्व तयारी बैठक परीक्षा भवन येथे बुधवार, दिनांक ९ ऑक्टोंबर २०२४ रोजी पार पडली. यावेळी महाविद्यालयीन स्तरावरील विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा संचालनात सर्व प्रकारची दक्षता घेण्याचे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ संजय कवीश्वर यांनी केले.

विद्यापीठ परिक्षेत्रातील एकूण १३६ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यापीठाच्या सत्र २, ४, ६ आणि ८ मधील माजी विद्यार्थ्यांच्या परीक्षांना मंगळवार, दि १५ ऑक्टोंबर पासून सुरुवात होत आहे तर हिवाळी नियमित परीक्षा १६ नोव्हेंबर पासून घेण्याचे नियोजन परीक्षा विभागाने केले असल्याची माहिती डॉ कवीश्वर यांनी यावेळी दिली. महाविद्यालयीन स्तरावर विद्यापीठाच्या सत्र १,३,५ व ७ च्या नियमित परीक्षा १६ नोव्हेंबर पासून घेतल्या जाणार आहे. या सर्व हिवाळी परीक्षांचे निकाल ३१ डिसेंबर २०२४ पूर्वी लावण्याचे परीक्षा विभागाचे नियोजन आहे.

Advertisement

व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश अद्याप सुरू असल्याने केवळ याच परीक्षा जानेवारी २०२५ मध्ये होतील, असे त्यांनी सांगितले. परीक्षांचे संचालन करताना विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची दक्षता केंद्राधिकार्‍यांना घ्यावयाची आहे. संपूर्ण परीक्षा विद्यार्थी केंद्रित असावी. मात्र, अन्य सर्व बाबीं बाबत दक्षता घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच परीक्षा नियमनाबाबत विभागाकडून देण्यात आलेल्या सर्व सूचना पत्रकांचे वाचन करून त्यावर अंमल करावा असे आवाहन डॉ कवीश्वर यांनी केले. 

तत्पूर्वी उपकुलसचिव नवीनकुमार मुंगळे यांनी परीक्षेबाबत संपूर्ण माहिती उपस्थित त्यांना दिली. जुन्या व नवीन उत्तरपत्रिका, विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिका उपलब्ध करून दिल्यानंतर घ्यावयाची दक्षता, किती गुणांसाठी किती वेळ परीक्षा, परीक्षा संचालनात शिक्षकांची मदत, उत्तर पत्रिका कशाप्रकारे विद्यापीठाकडे पाठवायची आधी सर्व विषयांबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. उपकुलसचिव मोतीराम तडस यांनी ऑनलाइन परीक्षांबाबत माहिती दिली. ऑनलाइन प्रश्नपत्रिका कशाप्रकारे लॉगिन आयडी वरून डाऊनलोड करावी. सेंटर लिस्ट डाऊनलोड करीत तपासणी करून घेण्याची माहिती त्यांनी दिली.

पदवी पदविका व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांसंबंधी माहिती सर्व परीक्षा केंद्रांना ऑनलाइन पाठवली जाणार आहे. परीक्षांचे सर्व नियमन ऑनलाईन होणार असल्याने महाविद्यालयातील संगणक संच अत्याधुनिक असावा असे त्यांनी सांगितले. सोबत प्रश्नपत्रिका डाऊनलोड करतेवेळी घ्यावयाच्या सूचनांची माहिती त्यांनी दिली. यावेळी उपकुलसचिव नवीनकुमार मुंगळे, मोतीराम तडस, सहाय्यक कुलसचिव डी एस पवार, उमेश लोही, नितीन कडबे यांच्यासह प्राचार्य व केंद्राधिकारी यांची उपस्थिती होती. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page