राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्री पीएचडी कोर्सवर्क वेळापत्रक घोषित
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्री- पीएचडी कोर्सवर्क वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. दक्षिण अंबाझरी मार्गावरील सुभाष नगर येथील विद्यापीठाच्या यूजीसी-एचआरडीसी येथे संशोधक विद्यार्थ्यांना ९ डिसेंबर ते २१ डिसेंबर दरम्यान कोर्सवर्क पूर्ण करता येणार आहे. विद्यापीठाने याबाबत गुरुवार, दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी परिपत्रक निर्गमित केले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे २८ जून २०२३ रोजीचे सुधारित मार्गदर्शक तत्वे आणि युजीसी-एमएमटीसीसीच्या २०२३ घ्या ३४ दिशानिर्देशानुसार प्री- पीएचडी कोर्सवर्क वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. संशोधक विद्यार्थ्यांना ९ डिसेंबर ते २१ डिसेंबर दरम्यान कोर्सवर्क पूर्ण करता येईल. कोर्स वर्क पूर्ण करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांची २१ डिसेंबर २०२४ रोजी परीक्षा घेतली जाणार आहे.
कोर्सवर्क करिता विद्यापीठाच्या (www.nagpuruniversity.ac.in) या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. संपूर्ण भरलेला अर्ज, पीएचडी नोंदणी प्रमाणपत्र, शुल्काचा भरणा केलेली पावती यासह आवश्यक कागदपत्र विद्यापीठाच्या यूजीसी-एचआरडीसी येथे सादर करावे लागणार आहे. या कोर्सवर्क करिता ५० प्रवेश क्षमता आहे.
विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकरे यांनी प्री-पीएचडी कोर्स वर्क कार्यक्रमाला मान्यता दिली असून संशोधक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रभारी प्र-कुलगुरू डॉ राजेंद्र काकडे, कुलसचिव डॉ राजू हिवसे, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ संजय कवीश्वर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ समय बनसोड यांच्यासह अन्य सदस्यांनी केले आहे.