एमजीएम विद्यापीठात रस्ते सुरक्षा अभियान यशस्वीपणे संपन्न

आपली सुरक्षा, आपल्या हाती – कुलगुरू डॉ. विलास सपकाळ

छत्रपती संभाजीनगर : एमजीएम विद्यापीठात सर्वांना हेल्मेट बंधनकारक असून विद्यापीठाचे विद्यार्थी हेल्मेट घालूनच आपला प्रवास करतात. आपली सुरक्षा आपल्या हाती असून आपले आयुष्य देशासाठी, कुटुंबासाठी मौल्यवान असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी यावेळी केले. महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज एमजीएम विद्यापीठात रस्ते सुरक्षा अभियानाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी उपस्थितांशी संवाद साधला. 

यावेळी, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी मनिष दौंड, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सविता पवार, मोटार वाहन निरीक्षक जयश्री बागूल, मोटार वाहन निरीक्षक मनोज चव्हाण, श्री. देवकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. आर. आर. देशमुख सर्व संबंधित अधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी बोलताना कुलगुरू डॉ. विलास सपकाळ म्हणाले, रस्ते सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि ड्रोन तंत्रज्ञान अशाप्रकारचे अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यापीठाने सुरू केले आहेत. अपघात कमी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करीत संशोधन करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्या नावीन्यपूर्ण कल्पनांच्या माध्यमातून स्टार्टअपही आपण सुरू करू शकतात. येत्या काळात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रादेशिक परिवहन विभागासमवेत ‘सामंजस्य करार’ करीत विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिल्या जातील.

Advertisement

मोटर वाहन अपघातांस परिणामकारकरीत्या आळा बसावा व नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार होण्याकरिता दरवर्षी संपूर्ण देशभरात रस्ता सुरक्षा अभियान आयोजित करण्यात येते. राज्यात १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या दरम्यान राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहे. आपला स्वत: जीव महत्वपूर्ण असून आपण सर्वांनी हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. आपल्यावर कुटुंबियांची जबाबदारी असते, त्यामुळे स्वत:ची काळजी घेत जगणे गरजेचे आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे येत कार्य करूया आणि राष्ट्राला अपघात मुक्त करूया असे प्रादेशिक परिवहन अधिकारी मनिष दौंड यांनी यावेळी सांगितले.

रस्ता सुरक्षाविषयक जनजागृतीसाठी आज एमजीएम विद्यापीठ ते बाबा पेट्रोल पंपदरम्यान ‘हेल्मेट बाईक रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे आज झालेल्या कार्यक्रमात बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या प्रवासादरम्यान खबरदारीची माहिती देणारा माहितीपट दाखविण्यात आला. कार्यक्रमाची सांगता रस्ता सुरक्षा प्रतिज्ञेनेसह करण्यात आली.

रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा

रस्ता सुरक्षा माझे ध्येय आहे.

अपघातग्रस्तांची मदत करणे माझे कर्तव्य आहे.

मी सदैव स्वयंप्रेरणेने,

वाहतुकीच्या नियमांचे व कायद्यातील तरतुदींचे

काटेकोरपणे पालन करीन.

मी शपथपूर्वक प्रतिज्ञा करतो की,

माझा देश अपघातमुक्त होण्यासाठी,

सुरक्षितपणे वाहन चालविण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून

मी सदैव प्रयत्न करीन.

रस्त्याचा वापर करणाऱ्या सर्वांचा मी आदर करीन.

रस्ता सुरक्षेचा प्रचार व प्रसार

आणि देशबांधवांच्या सुरक्षेत

माझे सौख्य सामावले आहे.

जय हिंद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page