राज्यस्तरीय गुणवत्ता हमी कक्षाची उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आढावा बैठक संपन्न
जळगाव : राज्यातील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय गुणवत्ता हमी कक्षाचे अध्यक्ष, माजी कुलगुरु प्रा प्रमोद येवले आणि समिती सदस्यांनी ११ नोव्हेंबर रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात दिवसभर बैठक घेतली. या बैठकीत विद्यापीठाच्या विकासाबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
राज्य शासनाने फेब्रुवारी २०२४ मध्ये राज्यस्तरीय गुणवत्ता हमी कक्षाची निर्मिती केली आहे. राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये प्राचार्य व प्राध्यापकांची संख्या कमी असल्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे समितीच्या निरीक्षणात आले आहे. तसेच परीक्षांच्या निकालाचा विलंब, नॅक मूल्यांकन, आणि संशोधन कार्यावर देखील परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. या समस्यांच्या निराकरणासाठी समितीने शासनाकडे काही शिफारसी सादर केल्या असून, त्या अनुषंगाने विविध विद्यापीठांना भेटी देऊन माहिती संकलित केली जात आहे.
बैठकीच्या पहिल्या सत्रात विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक प्रा समीर नारखेडे यांनी विद्यापीठाचा सविस्तर आढावा सादर केला. कुलगुरु प्रा व्ही एल माहेश्वरी यांनी विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी प्रा प्रमोद येवले, डॉ विजय खरे, डॉ भालचंद्र वायकर आणि नोडल अधिकारी डॉ पांडुरंग बरकले यांनी समितीची भूमिका स्पष्ट केली. प्रा येवले यांनी सांगितले की, या बैठकीच्या निष्कर्षावरून राज्य शासनाकडे अहवाल सादर करण्यात येईल.
दुपारच्या सत्रात नॅक मानांकन प्राप्त महाविद्यालयांच्या प्राचार्यांसमवेत चर्चा करण्यात आली, जिथे त्यांना स्वायत्ततेसाठी प्रोत्साहनपर मार्गदर्शन दिले गेले. चर्चेत विविध महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते, ज्यांनी नॅक मानांकनासंबंधित अनुभव आणि अडचणी मांडल्या. तिसऱ्या सत्रात नॅक मानांकन न केलेल्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांसोबत देखील संवाद साधण्यात आला.
बैठकीला विद्यापीठाचे प्र-कुलगुरु प्रा एस टी इंगळे, कुलसचिव डॉ विनोद पाटील, अधिष्ठाता प्रा अनिल डोंगरे, परीक्षा संचालक प्रा योगेश पाटील, वित्त व लेखा अधिकारी सीए रवींद्र पाटील, आणि इतर विभाग प्रमुख उपस्थित होते.
राज्यस्तरीय गुणवत्ता हमी कक्षाच्या बैठकीमुळे राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांच्या गुणवत्ता सुधारणा कार्यात सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.