मुक्त विद्यापीठात राष्ट्रीय मधुमक्षिका पालन कार्यक्रम अंतर्गत निवासी प्रशिक्षण संपन्न
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्र येथे राष्ट्रीय सधुमक्षिका पालन व मध मिशन (NBHM) अंतर्गत सात दिवसीय निवासी मधुमक्षिका पालन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. दिनांक १९ ते २५ मे २०३५ या कालावधीत झालेल्या या विशेष प्रशिक्षणात ३० पैकी १२ जण हे भारतीय रेल्वे पोलीस विशेष सुरक्षा दलाचे (RPSF) अधिकारी व कर्मचारी होते. त्यात महाराष्ट्रासह तेलंगणा, तामिळनाडू, हरयाणा, जम्मू – काश्मीर, राजस्थान येथील प्रशिक्षणार्थींचा समावेश होता.

विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कृषी विज्ञान केंद्र पुढाकाराने आणि सहकार्याने प्रशिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली. प्रशिक्षणात मधुमक्षिकांचे जैविक व स्थानिक महत्त्व, त्यांचे संवर्धन, काळजी घेण्याच्या पद्धती, रोग व त्यावरील उपाय, शेती व वन पर्यटनासाठी मधुमक्षिकांचे योगदान आणि जलद परागीभवनासाठीचे महत्व, स्थानिक जातीचे संवर्धन आदी विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. गोपाल पालीवाल (नागपूर), डॉ. तुकाराम निकम (नाशिक), डॉ. धनंजय वाखले, डॉ. डेसी थॉमस व श्रीमती सुरेखा जाधव (पुणे) या मधुमक्षिका शास्त्रज्ञ, जैविक शेती तज्ज्ञ व कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणार्थीना प्रत्यक्ष मधुमक्षिका हाताळणी, मधुमक्षिका वसाहत विभाजन आणि वसाहत तपासणी अशा विविध प्रात्यक्षिकांद्वारे अनुभव देण्यात आला. प्रशिक्षणार्थीनी विद्यापीठ परिसरातील नैसर्गिक वनराईमध्ये मधुमक्षिकांचे निरीक्षणही केले.
या कालावधीत दिनांक २० मे रोजी जागतिक मधुमक्षिका दिन उत्साहात व सृजनात्मक पद्धतीने साजरा करण्यात आला. या दिवशी मधुमक्षिका संवर्धनाच्या शपथविधी कार्यक्रम, प्रशिक्षणार्थी / शेतकऱ्यांसोबत संवाद सत्राचे आयोजनही करण्यात आले. प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या प्रशिक्षणाचा उद्देश केवळ मधुमक्षिका पालनाचे कौशल्य शिकवणे नव्हे, तर “मधु साक्षरता” (Bee Literacy) ग्रामीण भागात पोहोचवणे हा आहे. त्या दृष्टीने शेतकरी व ग्रामीण युवक – युवतींना मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण व तांत्रिक मार्गदर्शन दिले जाते. त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन विद्यापीठाचे प्र- कुलसचिव डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन, कुलसचिव श्री. दिलीप भरड आणि कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्रज्ञ व प्रमुख डॉ. नितीन ठोके यांनी केले आहे.