भाषाशास्त्र आणि आधुनिक विज्ञान यांची सांगड घालून संशोधन करावे – प्रो. विकास महात्मे
तांत्रिक ज्ञानाला मानवी बुद्धिमत्तेचा परिसस्पर्श लाभला तर संशोधनाची अनेक दालने खुली होतील – प्रो. हरेराम त्रिपाठी
रामटेक : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या संगणक विज्ञान विभागाद्वारे कृत्रिम बुध्दिमत्ता व मशीन लर्निंग या विषयावर आज मंगळवार, दि. २३ जानेवारी २०२४ एक दिवसीय चर्चासत्र संपन्न झाले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी या नात्याने प्रो. विलास महात्मे, विभागप्रमुख, संगणक तंत्रज्ञान विभाग, कविकुलगुरू तंत्रज्ञान व विज्ञान संस्था, रामटेक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी होते. कुलसचिव प्रो. कृष्णकुमार पाण्डेय, शिक्षणशास्त्र अधिष्ठाता प्रो. ललिता चंद्रात्रे आणि संगणक विज्ञान विभाग प्रमुख व चर्चासत्राच्या आयोजिका प्रो. कीर्ती सदार उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाला. बदलत्या अभ्यासक्रमातील कृत्रिम बुध्दिमत्ता आणि मशीन लर्निंग या विषयाचे नवीन आयाम समजावे यासाठी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याचे संगणक विज्ञान विभाग प्रमुख डॉ. कीर्ती सदार यांनी प्रास्ताविकात सांगितले. प्रो. विलास महात्मे आपल्या भाषणात म्हणाले की, मेषाद्वारे जो संदेश हिमालयातील अलका नगरीत राहत असलेल्या आपल्या पत्नीला पाठविला तो या Cloud मॅसेंजरद्वारेच होय. मला आनंद होतो की भाषा विद्यापीठात साहित्य, दर्शन या विषयांसह संगणक विज्ञान सारख्या आधुनिक विषयांचे अध्ययन होते, हे प्रशंसनीय आहे. मी आवाहन करतो की भाषाशास्त्र आणि आधुनिक विज्ञान यांची सांगड घालून नवसंशोधन येथील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी करावे. विद्यार्थ्यांनी चर्चा, विश्लेषण, आणि समर्पित वृत्तीने कार्य करावे. गुरुजवळ बसून शिकावे गुगलवर अवलंबून राहू नये असा मोलाचा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. विद्यार्थ्यांनी या टेक्नोत्सवात सहभागी होवून शिकावे असे प्रतिपादन प्रो. महात्मे यांनी केले.
प्रो. कृष्णकुमार पांडेय यांनी पारंपरिक शास्त्रासोबत आधुनिक शस्त्र अर्थात् आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक असल्याचे म्हटले. शास्त्र आणि आधुनिक तंत्र यांच्या मिलाफाने संस्कृत क्षेत्रात नव-नवीन संशोधन करण्यास वाव आहे. शास्त्र आणि कृत्रिम बुध्दिमता नवयुगातील साधने आहेत. शिक्षणशास्त्र संकायाच्या अधिष्ठाता प्रो. ललिता चंद्रात्रे यांचेही याप्रसंगी समयोचित भाषण झाले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी म्हणाले, ” सध्याचे युग हे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीनी अनुवादाचे आहे. हैद्राबाद येथे प्रो. विनीत चैतन्य यासंदर्भात मोठे कार्य करीत आहेत. यासारखे विषय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले तर संस्कृत व संगणकीय भाषाशास्त्रात उत्तम कार्य होवू शकते. संगणकीय सॉफटवेअर, मशीनी अनुवाद आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा विवेकी वापर करून संस्कृतमधील शास्त्रांचे अनुवाद, विश्लेषण केले जावू शकते. तांत्रिक ज्ञानाला मानवी बुद्धिमत्तेचा परिसस्पर्श लाभला तर संशोधनाची अनेक दालने खुली होतात. या क्षेत्रात कार्य करणा-यांना मोठ्या संधी उपलब्ध आहेत. प्रत्येक व्यक्तीची आवड वेगवेगळी असते, त्यानुसार संशोधनाची क्षेत्रेही भिन्न होतात. आधुनिक युगातील या साधनांचा आणि आपल्या आवडीचा मेळ साधून अध्ययन-संशोधन करावे असे आवाहनही कुलगुरू महोदयांनी करावे.
या चर्चासत्राच्या निमित्ताने पोस्टर प्रेझेन्टेशन स्पर्धा घेण्यात आली त्या विविध तंत्रशास्त्रीय विषयांवर ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. मनाली पंडे तर आभार स्नेहा आष्टनकर यांनी मानले. कार्यक्रमाला अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते.