एलईडीच्या पिवळ्या प्रकाशामुळे डासांना पळविण्याचे नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे संशोधन
आंतरराष्ट्रीय पेटंट मिळविले
नागपूर : डासांमुळे पसरणाऱ्या डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यांसारख्या रोगांना नियंत्रणात आणण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील एमएससी नॅनोसायन्सच्या विद्यार्थ्यांनी एलईडीचा पिवळा प्रकाश डासांना दूर ठेवू शकतो हे सिद्ध करणारे संशोधन केले आहे. भौतिकशास्त्र विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ संजय जानराव ढोबळे यांच्या मार्गदर्शनात केलेल्या या संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील पेटंट मिळाले आहे, ज्यामुळे या महत्त्वपूर्ण शोधाचे अधिकृत प्रमाण मिळाले आहे.
डासांना दूर ठेवण्यासाठी एलईडीचा पिवळा प्रकाश:
भौतिकशास्त्र विभागातील डॉ ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एमएससी नॅनोसायन्स व नॅनो टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी मुकेश तुरकाने, सिद्धेश्वर नागपुरे, प्रणाली झाडे आणि संशोधक विद्यार्थी डॉ अभिजीत कदम यांनी एकत्रितपणे एलईडीच्या पिवळ्या प्रकाशाचा उपयोग करून डासांना कसे पळवता येईल हे सिद्ध केले. या संशोधनाद्वारे एलईडीच्या पिवळ्या प्रकाशाने डासांना आकर्षित न करता त्यांना दूर ठेवता येते हे स्पष्ट झाले. संशोधनादरम्यान, विविध रंगाच्या प्रकाशांचा वापर करण्यात आला ज्यामध्ये लाल, निळा आणि पिवळा रंग विचारात घेतला गेला. परिणामतः पिवळ्या रंगाच्या प्रकाशामुळे डास दूर राहतात हे सिद्ध झाले.
डासांपासून संरक्षणासाठी उपयुक्त उपाय :
शहरातील तसेच ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना डासांच्या संसर्गामुळे होणाऱ्या रोगांचा त्रास सहन करावा लागत आहे. बाजारात विविध प्रकारचे उपाय उपलब्ध असले तरी एलईडीचा पिवळा प्रकाश हा पर्यावरणपूरक आणि प्रभावी पर्याय ठरू शकतो. घराच्या मुख्य दरवाजांवर, खिडक्यांवर, किंवा बागेत पिवळ्या प्रकाशाचे दिवे लावल्यास डासांची संख्या कमी होते, असा हा संशोधनाचा निष्कर्ष आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया यांसारख्या आजारांपासून संरक्षण मिळू शकते.
समाजोपयोगी संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय मान्यता :
डॉ संजय ढोबळे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी केलेले हे संशोधन समाजासाठी उपयुक्त असून, त्यांना मिळालेली आंतरराष्ट्रीय पेटंट मान्यता या संशोधनाला जागतिक स्तरावर अधिक महत्त्व देते. डॉ ढोबळे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना संशोधनाच्या दिशेने पुढे जाण्याचा सल्ला दिला. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ राजेंद्र काकडे, कुलसचिव डॉ राजू हिवसे, आणि भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ ओमप्रकाश चिमणकर यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
हे संशोधन समाजाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले असून, नवीन पिढीला वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधनात्मक विचारांना प्रोत्साहन देणारे आहे.