नागपूर विद्यापीठाच्या औषधी निर्माणशास्त्र विभागाचे संशोधनाने महिलांच्या जननेंद्रियातील संसर्गावर आता तत्काळ उपचार
‘लॉसोन पसेरी’ पद्धत केली विकसित
नागपूर : महिलांच्या जननेंद्रियातील संसर्गावर तत्काळ उपचार करण्याच्या अनुषंगाने नवीन उपचारात्मक पद्धत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील औषधी निर्माणशास्त्र विभागाने विकसित केली आहे. औषधी निर्माणशास्त्र विभागातील प्राध्यापिका डॉ रिता वडेतवार यांच्या चमुने महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असे संशोधन केले आहे.

महिलांच्या जननेंद्रियातील संसर्गामुळे अनेकदा त्यांच्या गर्भाशयावर गंभीर परिणाम होतो. यातून गर्भपात किंवा आरोग्याच्या इतर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. शिवाय संसर्ग काढण्यासाठी शस्त्रक्रिया ही करावी लागतात. या संशोधनामुळे जननेंद्रियातील संसर्गावर महिलांना तातडीने उपचार मिळणे शक्य होणार आहे. गत काही वर्षांमध्ये महिलांमध्ये या संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. संसर्ग अनेक कारणांनी होत असल्याने त्यातून आजार बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे या संसर्गावर तातडीने उपचार करणे गरजेचे असते. ही बाब लक्षात घेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधी निर्माणशास्त्र विभागातील डॉ रिता वडेतवार यांनी विद्यार्थी प्रणिता कनोजिया, मयूर लाडे, अतुल चौधरी यांच्यासह या संसर्गाला दूर करण्यासाठी संशोधन केले.
या संसर्गाला दूर करण्यासाठी त्यांनी मेहंदीच्या पानांचा उपयोग केला. मेहंदीच्या पानांमध्ये ‘लाॅसोन’ हा सक्रिय घटक आहे. त्यामध्ये अँटीफंगलचे औषधीय गुणधर्म असून ती उपचारासाठी प्रभावी ठरू शकतात ही बाब समोर आली. या लक्षणांवर आधारित संशोधन यापूर्वी झाले नाही. त्यामुळे याचा वापर करीत डॉ रिता वडेतवार यांनी ‘लाॅसोन पसेरी’चा प्रभावी औषधीय घटक म्हणून वापर करीत नवीन उपचार पद्धत विकसित केली. या संशोधनातून विकसित केलेल्या पद्धतीला डॉ रिता वडेतवार यांना दोन राष्ट्रीय पेटंट मिळाले आहे.
याशिवाय ‘सीएसआयआर’ द्वारे संशोधनाला अर्थसहाय्य करण्यात आले. जननेंद्रियाच्या संसर्गातील संशोधनासाठी डॉ रिता वडेतवार यांनी आठ संशोधन पेपर प्रकाशित केले आहे. तीन पेटंट मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवी वर्षाच्या निमित्याने समाजातील गरजा ओळखून त्या दिशेने संशोधन करण्याचे आवाहन तत्कालीन कुलगुरूंनी केले होते. त्या दिशेने विद्यापीठातील सर्वच विभागातील शिक्षक तसेच संशोधकांनी विविध संशोधन कार्य सुरू केले. समाजाला उपयोगी पडेल अशा संशोधन कार्यासाठी प्रभारी कुलगुरू डॉ माधवी खोडे चवरे, कुलसचिव डॉ राजू हिवसे यांचे सदैव पाठबळ लाभत आहे.
कुलगुरूंच्या हस्ते सन्मान
महिलांच्या गंभीर आजारावर महत्वपूर्ण संशोधन केल्याने कुलगुरू डॉ माधवी खोडे चवरे यांनी औषधी निर्माण शास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ रिता वडेतवार व विद्यार्थिनी प्रणिता कनोजिया यांचा सन्मान केला. यावेळी कुलसचिव डॉ राजू हिवसे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या संशोधनाबाबत औषधी निर्माणशास्त्र विभाग प्रमुख डॉ प्रशांत पुराणिक यांनी डॉ रिता वडेतवार यांच्यासह विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
महिलांच्या कल्याणासाठी संशोधन
‘लॉसोन पेसरी फार्म्युलेशन’ ही वैज्ञानिक प्रगती असून निसर्गाच्या ज्ञानाला औषधीय नवोपक्रमाशी जोडते. महिलांच्या जननेंद्रियातील संसर्गाचे व्यवस्थापन करण्याची सुरक्षित प्रक्रिया आहे. नैसर्गिक विज्ञानाद्वारे महिलांचे आरोग्य सक्षम करणे हा संशोधनाचा हेतू आहे. हर्बल आणि आयुर्वेदिक उद्योगातून महिलांच्या कल्याणासाठी या संशोधनाचा वापर करता येणे शक्य होईल.