राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात प्रजासत्ताक दिन समारोह उत्साहात साजरा
देशाच्या उभारणीत शिक्षकांचे महत्त्वपूर्ण योगदान – डॉ राजेंद्र काकडे
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात भारत देशाचा ७६ वा प्रजासत्ताक दिन कार्यक्रम महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरातील जमनालाल बजाज प्रशासकीय भवनासमोरील हिरवळीवर रविवार, दि. २६ जानेवारी २०२५ रोजी पार पडला. प्रभारी प्र-कुलगुरू डॉ राजेंद्र काकडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.






विद्यार्थी घडविला तर देश घडेल. विद्यार्थी घडविण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे देशाच्या उभारणीत शिक्षकांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे प्रतिपादन मार्गदर्शन करताना प्र-कुलगुरु डॉ राजेंद्र काकडे यांनी केले. अनेकांनी प्राणाची आहुती देत आपणास स्वातंत्र्य प्राप्त करून दिले. अशा सर्व देशभक्तांना प्र-कुलगुरु डॉ काकडे यांनी सर्वप्रथम अभिवादन केले. शंभर वर्षाचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या विद्यापीठाने देशाला माजी प्रधानमंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, मुख्यमंत्री, उद्योजक असे महान व्यक्तिमत्व दिल्याचे त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्यानंतर देशाने सर्वच क्षेत्रात मोठी उपलब्धी प्राप्त केली आहे. विद्यापीठाने देखील नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थी सक्षम होईल या दृष्टीने त्यांच्या कौशल्य वाढीसाठी प्रयत्न करायला हवे, असे ते म्हणाले. यावेळी पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना स्मृृतिचिन्ह प्रमाणपत्र व ग्रंथ प्र-कुलगुरु डॉ राजेंद्र काकडे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले.
यामध्ये प्रथम क्रमांक वंदना महात्मे, द्वितीय क्रमांक तृप्ती तिवारी, तृतीय क्रमांक सुश्मिता मलिक व उत्तेजनार्थ साक्षी धमगाये यांनी प्राप्त केले. यावेळी कुलसचिव डॉ राजू हिवसे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ प्रशांत माहेश्वरी, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ संजय कविश्वर, मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ शामराव कोरेटी, आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ प्रशांत कडू, वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल, ज्ञान स्त्रोत केंद्र संचालक डॉ विजय खंडाळ, रासेयो संचालक डॉ सोपानदेव पिसे यांच्यासह विविध शैक्षणिक विभागांचे प्रमुख, संचालक, शिक्षक, अधिकारी व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचलन डॉ आदित्य सोनी यांनी केले.