राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात वाचन कौशल्य कार्यशाळा संपन्न
ज्ञानाचा प्रसार करण्याची भारताची परंपरा – ज्येष्ठ संपादक विजय फणशीकर यांचे प्रतिपादन
नागपूर : ज्ञानाचा प्रसार करण्याची भारताची परंपरा आहे, असे प्रतिपादन दि हितवादचे संपादक विजय फणशीकर यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात बुधवार, दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी वाचन कौशल्य कार्यशाळा पार पडली. विद्यापीठ ज्ञानस्त्रोत केंद्र, विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रम अंतर्गत आयोजित कार्यशाळेत फणशीकर मार्गदर्शन करीत होते.


कार्यशाळेला प्रमुख वक्ते म्हणून दैनिक दि हितवादचे संपादक विजय फणशीकर उपस्थित होते, प्रभारी प्र-कुलगुरु डॉ राजेंद्र काकडे यांनी अध्यक्षस्थान भूषविले तर कुलसचिव डॉ राजू हिवसे, ज्ञानस्त्रोत केंद्र संचालक तथा विद्यार्थी विकास विभाग प्रभारी संचालक डॉ विजय खंडाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. फार वर्षांपूर्वी चीन मधून आलेल्या एका प्रवाशाचे उदाहरण देत समृद्ध अशा भारतीय ज्ञान परंपरेची माहिती फणशीकर यांनी पुढे बोलताना दिली. फार वर्षांपूर्वी चिनी प्रवासी आल्यानंतर १६ वर्ष भारतात राहिला.
पूर्वी दगड, भूर्जपत्र, कापडावर हाताने ग्रंथ लिहिली जात होती. हाताने पुस्तके लिहिणे अत्यंत कठीण कार्य होते. एक पुस्तक लिखाण करायला अनेक वर्ष लागायची. त्यामुळे त्यावर सुरुवात केली ते वर्ष आणि लिहून झाल्यानंतर शेवट लिहिला जात होता. अशी कोट्यावधी पुस्तके भारतात लिहिली गेली होती. चिनी प्रवाशाने ती गोळा केली. येथील लोकांनी देखील ती पुस्तके सहजतेने दिली. यावरून आपली ज्ञान वाटण्याची तसेच जतन करण्याची मोठी परंपरा होती, असे फणशीकर म्हणाले.
ज्ञान परंपरेने समृद्ध असलेल्या भारताला पराभूत करण्यासाठी अनेकदा आक्रमण झाले. मात्र, परकीयांना पराभूत व्हावे लागले. भारताचे शक्तिस्थळ कोणते हे शोधून काढण्यासाठी त्यांनी आपले हेर पाठविले. भारताची सुरक्षा भेदून काही परकीय आत शिरल्यानंतर हेरांनी आधी नालंदा उध्वस्त करण्यास सांगितले. त्यावेळी तेथे असलेल्या ग्रंथालयातील पुस्तके बाहेर काढून जाळण्यात आली. पुस्तकांना जाळायला सहा महिन्यांचा कालावधी लागला, असे ज्ञान भांडार भारतात जवळ होते. किंबहुना त्यापेक्षा मोठे ज्ञान भांडार भारतात होते. इंग्रज आल्यानंतर त्यांनी ‘सर्वे ऑफ इंडिया’ सुरू केला. यातून मद्रास प्रेसिडेन्सीत तब्बल २४ हजार शैक्षणिक संस्था असल्याचा उल्लेख आहे. त्यावेळी भारतात शंभर टक्के साक्षरता आढळून आली होती. इंग्रजांना हेच भारतीयांचे ज्ञान भंडार नष्ट करायचे होते. याला उत्तर कसे देणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांना करीत वाचन संकल्प हेच यावर उत्तर असल्याचे फणशीकर म्हणाले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला त्यांनी कक्षा विस्तारणारे स्थान आहे, असे सांगितले. सर्व विषयाचे ज्ञान मिळवीत ज्ञानाची कक्षा विस्तारता आली. कोणत्याही वर्गात बसून व्याख्यान ऐकता येत होते. त्याकाळी प्रत्येक विषयाच्या शिक्षकाने प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यापीठाच्या महानतेचे काय वर्णन करू, असे ते म्हणाले. संपूर्ण जगभर भ्रमंती करीत असताना या विद्यापीठाचा विद्यार्थी म्हणून लोकांनी सन्मानपूर्वक स्वीकारले असल्याचे फणशीकर म्हणाले. दैनंदिन वाचन करण्याची सवय कशाप्रकारे अंगीकारता आली याची माहिती त्यांनी दिली.
नागपूर येथून सायकलने अमरावतीला जात असताना गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंतांनी पुस्तक वाचन करण्याचा दिलेला मंत्र आजही आठवला की अंगावर शहारे येतात, असे फणशीकर म्हणाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगेबाबा, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचे उदाहरण देत वाचनाचे महत्व त्यांनी पटवून दिले. अध्यक्षीय भाषण करताना प्र-कलगुरु डॉ राजेंद्र काकडे यांनी विद्यार्थ्यांमधील वाचन क्षमता आज कमी होत असून त्यांचा मोबाईलवरील स्क्रीन टाईम वाढला असल्याचा धोका व्यक्त केला. वाचन संस्कृतीत वाढ करीत विद्यार्थ्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना ज्ञानस्त्रोत केंद्र संचालक तथा विद्यार्थी विकास विभाग प्रभारी संचालक डॉ विजय खंडाळ यांनी वाचन संस्कृती वाढावी म्हणून १ ते १५ जानेवारी दरम्यान वाचन पंधरवाडा राबविण्याचे आवाहन महाराष्ट्र सरकारने केले असल्याचे सांगितले. ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रम अंतर्गत विद्यापीठाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असल्याची माहिती डॉ खंडाळ यांनी दिली. यामध्ये सामूहिक वाचन स्पर्धा, उत्कृष्ट लेखक- वाचक कार्यशाळा आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन डॉ अमृता इंदूरकर यांनी केले तर आभार कुलसचिव डॉ राजू हिवसे यांनी मानले. कार्यक्रमाला विविध प्राधिकारणींचे सदस्य, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता, सांविधिक अधिकारी, विविध शैक्षणिक विभागांचे प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.