नागपूर विद्यापीठाच्या डॉ वि भि उपाध्य भाऊसाहेब कोलते ज्ञानस्त्रोत केंद्रात वाचन संवाद उत्साहात संपन्न
अद्यावत ज्ञानातून आत्मविश्वासाची निर्मिती – माजी कुलगुरू डॉ पंकज चांदे यांचे प्रतिपादन
नागपूर : अद्यावत ज्ञान आत्मविश्वास निर्माण करते, असे प्रतिपादन कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेकचे माजी कुलगुरू डॉ पंकज चांदे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ वि भि उपाध्य भाऊसाहेब कोलते ज्ञानस्त्रोत केंद्राच्या वतीने लेखक व विद्यार्थी यांच्यामधील वाचन संवाद कार्यक्रम सोमवार, दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी रामदास पेठ येथील इंटरनॅशनल बुद्धिस्ट स्टडीज सेंटरच्या सेमिनार हॉलमध्ये पार पडला. या कार्यक्रमात डॉ चांदे मार्गदर्शन करीत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रभारी प्र-कुलगुरू डॉ राजेंद्र काकडे यांनी भूषविले. प्रमुख वक्ते म्हणून कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेकचे माजी कुलगुरू डॉ पंकज चांदे तर प्रमुख अतिथी म्हणून मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ शामराव कोरेटी, ज्ञान स्त्रोत केंद्र संचालक डॉ विजय खंडाळ, डॉ नीरज बोधी यांची उपस्थिती होती. प्राचीन काळात विद्यापीठाची संकल्पना मांडणारा भारत हा एकमेव देश होता, कसे डॉ पंकज चांदे यांनी पुढे बोलताना सांगितले.
भारतात गुरुकुल परंपरा व त्यानंतर बौद्धकालीन काळात विश्वविद्यालयाची संकल्पना होती. तसेच १४ विद्यापीठ निर्माण झाले होते. आक्रमणकर्त्यांनी येथील ज्ञानसंपदा नष्ट करण्याच्या उद्देशाने नालंदा विद्यापीठाच्या ग्रंथालयातील हस्तलिखिते पुस्तके जाळली. तेव्हा ती कित्येक महिने जळत होती. यावरून तत्कालीन ग्रंथालयाचा डोलारा किती मोठा होता. यावरून दिसून येत असल्याचे डॉ चांदे म्हणाले. ऋषींनी कोठे वाचले म्हणून वेद लिहिले असा उल्लेख संस्कृतचा अभ्यास करताना आढळून येतो. यावरून प्राचीन भारतात वाचन संस्कृती होती असे ते म्हणाले. सोबतच साहित्यातील विविध प्रकाराबाबत माहिती दिली.
असंबंध, दुर्बोध सद्गुण तसेच शक्ती, विपत्ती व प्रवृत्ती आदी प्रतिभा लेखकांमध्ये असावी लागते, त्या विषयाचे ज्ञान असावे लागते असे त्यांनी सांगितले. पुस्तकातून माहिती, ज्ञान व आनंद मिळतो. वाचनातून आपले ज्ञान अद्यावत होते. अद्यावत ज्ञान नसेल तर स्पर्धेतून बाहेर फेकले जाऊ. त्यामुळे वाचन संस्कृतीची गरज त्यांनी व्यक्त केली. वाचनाची परीक्षा घेणे गरजेचे आहे. वाचलेल्या मुद्द्यांची परीक्षा घेतल्याने वाचन संस्कृती वाढेल याकडे त्यांनी लक्ष वेधले.
वाचन माणसाला श्रेष्ठ बनविते – डॉ राजेंद्र काकडे
वाचन माणसाला श्रेष्ठ बनविते असे वक्तव्य प्र-कुलगुरु डॉ राजेंद्र काकडे यांनी अध्यक्षीय भाषण करताना केले. पूर्वी शिक्षक विद्यार्थ्यांकडून वाचन करून घेत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होत होती. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक गॅजेट्स हाती आल्याने वाचनाची सवय कमी झाली आहे. भारताला पुन्हा विश्वगुरू करायचे असेल तर विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय पुन्हा रुजविणे गरजेचे असल्याचे डॉ काकडे यांनी सांगितले. मनोगत व्यक्त करताना मानव विज्ञान विद्या शाखा अधिष्ठाता डॉ शामराव कोरेटी यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा देखील वाचन संस्कृती वाढविण्यासाठी मदत घ्यावी असे सांगितले.
पुस्तके ग्रंथालय संग्रहालय डिजिटल होऊ पाहत आहे. त्यामुळे ज्ञानवृद्धी करण्यासाठी या ई-रिसोर्सची मदत घ्यावी असे डॉ कोरेटी म्हणाले. प्रास्ताविक करताना ज्ञान स्त्रोत केंद्र संचालक डॉ विजय खंडाळे यांनी वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत लेखक व विद्यार्थी यांच्यामधील वाचन संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत विद्यापीठाने कशाप्रकारे नियोजन करीत विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचवला याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन डॉ प्राची यांनी केले तर आभार डॉ पुजा दाढे यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.