नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा
दर्जेदार वाचनासाठीचा सलग अवकाशच हरवला – वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात डॉ शैलेंद्र लेंडे यांची खंत
नागपूर : दर्जेदार वाचनासाठीचा सलग अवकाशच हरवला असल्याची खंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ पदव्युत्तर मराठी विभाग प्रमुख डॉ शैलेंद्र लेंडे यांनी व्यक्त केली. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस वाचन प्रेरणादिन म्हणून पदव्युत्तर मराठी विभागात मंगळवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०१४ रोजी साजरा करण्यात आला. या अभिवाचन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ लेंडे बोलत होते.
विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मराठी विभाग प्रमुख डॉ शैलेंद्र लेंडे यांनी भूषविले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विभागातील प्रा डॉ प्रज्ञा निनावे, प्रा अमित दुर्योधन, प्रा प्रज्ञा दुधे यांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना ‘आज तंत्रज्ञानाच्या युगात मोबाइलमुळे आपण एकमेकांच्या संपर्कात असणे सहजसोपे झाले असले, तरी त्यातील संदेश माहिती देण्यापुरते मर्यादित आहेत, माणसाच्या मन आणि मेंदूला ऊर्जितावस्था देणारे नाहीत, असे डॉ लेंडे म्हणाले. वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात विभागातील विद्यार्थी दिनेश बांडेबुचे, वैशाली फुले, सीमा हटवार, हेमलता वानखेडे, मानसी रामटेके, ऐश्वर्या शिंदे यांनी विविध पुस्तकांतील निवडक उताऱ्यांचे वाचन केले.
प्रा डॉ निनावे यांनी आपल्या मार्गदर्शनात वाचनामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगिण विकास घडत असल्याचे सांगितले. प्रास्ताविक करताना प्रा दुर्योधन यांनी दर्जेदार वाचन माणसाच्या चिंतनात, त्याच्या समाज व्यवहारात त्याला संवेदनशील व्यक्ती म्हणून घडविते, असे सांगितले. संचालन विद्यार्थिनी विशाखा पवार हिने केले, तर वैशाली फुले हिने आभार मानले. कार्यक्रमाला विभागातील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.