एमजीएम विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ विलास सपकाळ यांची पुनर्नियुक्ती
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास सपकाळ यांनी गुरूवार, दिनांक १८ एप्रिल २०२४ रोजी आपला तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला असून विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांनी कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यावेळी, झालेल्या कार्यक्रमात कुलपती अंकुशराव कदम यांनी पुढील तीन वर्षाकरिता डॉ. विलास सपकाळ यांची एमजीएम विद्यापीठाच्या कुलगुरूपदी पुनर्नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली. डॉ सपकाळ यांनी शुक्रवार, दिनांक १९ एप्रिल २०२४ रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
यावेळी, आदरणीय अनुराधाताई कदम, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, सर्व अधिष्ठाता, संचालक, प्राचार्य, विभागप्रमुख व सर्व संबंधित उपस्थित होते.
यावेळी बोलताना कुलपती अंकुशराव कदम म्हणाले, कुलगुरू म्हणून डॉ विलास सपकाळ यांनी चांगले काम केले आहे. येत्या काळामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध संस्थांशी सामंजस्य करार करून विद्यार्थ्यांना एक जागतिक पातळीवरील व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी ते काम करतील, असा मला विश्वास आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीमध्ये त्यांची भूमिका महत्वपूर्ण राहिलेली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणसाठी एमजीएम विद्यापीठ हे सर्वांसाठी आदर्श असून याचे श्रेय कुलगुरू डॉ विलास सपकाळ यांनी वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांना जाते. त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा !
एमजीएम विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गेली तीन वर्ष सातत्यपूर्ण काम करीत आलो आहे. कुलपती अंकुशराव कदम यांनी माझी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी पुनर्नियुक्ती केली असून हा माझ्यासाठी आनंददायी क्षण आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मी माझ्या कार्यकाळात यशस्वीपणे अंमलबजावणी करू शकलो. एमजीएम विद्यापीठाचे व्यवस्थापन मंडळ आणि नियामक मंडळ यांचे मला कायम मार्गदर्शन लाभले आहे. एमजीएम परिवार व माझे सहकारी यांच्या सहकार्यासह विद्यापीठाचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी अधिक जोमाने आम्ही सर्वजण मिळून कार्यरत राहू !
कुलगुरू डॉ विलास सपकाळ
प्रा डॉ विलास सपकाळ यांच्याविषयी माहिती :
कुलगुरू डॉ विलास सपकाळ यांनी आयआयटी पवई येथून आपले रासायनिक तंत्रशास्त्र विषयात एमटेक आणि पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले आहे. ते सध्या महात्मा गांधी मिशन विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. या अगोदर त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहिलेले आहे. त्यांनी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक आणि संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणूनही काम पाहिले आहे. सध्या ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आधारित राज्य सरकारच्या सुकाणू समितीवर सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एमजीएम विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची यशस्वीपणे अंमलबजावणी केलेली आहे. अखिल भारतीय तंत्रशास्त्र परिषद आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या उच्चाधिकार समितीवर त्यांनी काम केलेले आहे. त्याचप्रमाणे त्यांना आंतरराष्ट्रीय संशोधनाचा अनुभव आहे.