राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात विशेष अतिथी व्याख्यान संपन्न
बौद्ध धर्माच्या मार्गाने जागतिक समुदायाचे गठन – मिशिगन स्टेट विद्यापीठातील प्रा जॉन क्यून यांचे प्रतिपादन
नागपूर : बौद्ध धर्माच्या मार्गाने देशांतरित आंबेडकवादी जनसमुहाद्वारे जागतिक समुदायाचे गठन होत असल्याचे प्रतिपादन मिशिगन स्टेट विद्यापीठातील प्रा जॉन क्यून यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात बुधवार, दिनांक १८ सप्टेंबर २०२४ रोजी अतिथी व्याख्यान पार पडले. यावेळी प्रा जाॅन क्यून बोलत होते.
विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ विकास जांभुळकर यांनी भूषविले. यावेळी पुढे मार्गदर्शन करताना प्रा क्यून यांनी आंबेडकरवादी प्रवासी संपूर्ण जगभरात विविध प्रकारे बौद्ध धर्माचा अभ्यास आणि आचरण करत समुदाय निर्माण करत असल्याचे सांगितले. युकेमधील दुसरी किंवा तिसरी पिढी असोत, यूएईमधील कामगार आणि व्यावसायिक असोत, किंवा अमेरिकेतील नव्या व्यावसायिकांची लाट यांच्या कडून जागतिक समुदायाचे गठन होत आहे. आंबेडकरवादी प्रवासी समूह जरी एक तुलनेने नवीन आणि उदयोन्मुख असला, तरी त्यांच्या जीवनाचा आणि ओळखीचा आधार बौद्ध धर्म नक्कीच आहे, असे ते म्हणाले.
भारतात देखील बौद्ध ओळख ही प्रामुख्याने जातीय धर्मातून मुक्तता म्हणून पाहिली जाते. जी अमानवीय स्थिती म्हणून ते सहज ओळखू शकतात, जी परदेशात दिसून येत नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची बौद्ध धर्माची कल्पना त्यांच्या अनुयायांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रभावी राहिली आहे. भारतात जपानी, तैवानी, थाईलंड किंवा श्रीलंकन बौद्ध धर्माच्या माध्यमातून आलेल्या विविध पद्धती आणि प्रथांमध्ये ते अजूनही चर्चा करत आहेत. तथापि, जगभरातील आंबेडकरवाद्यांनी बौद्ध धर्माला जरी वेगवेगळ्या प्रकारे समजले असले, तरीही बौद्ध धर्म हा आंबेडकरवादी प्रवासी समुदायामध्ये एकमेव संलग्नता आणि ओळखीचा बिंदू राहतो, असे त्यांनी प्रामुख्याने सांगितले.
राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ विकास जांभुळकर यांनी आपल्या भाषणात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक-राजकीय चळवळीचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी प्रेरित केलेल्या पिढ्यांना जीवनाकडे मुक्ततावादी दृष्टिकोन घेण्यास प्रोत्साहित केले, मग ती भारतात आणि परदेशात उच्च शिक्षण घेण्याची गोष्ट असो, राजकीय सहभाग असो किंवा सामाजिक उन्नती असो, याचा उद्देश प्रतिष्ठा आणि न्यायाकडे होता, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन तृतीय सत्रातील विद्यार्थिनी सिमरन थुल यांनी केले तर आभार प्रथम सत्रातील विद्यार्थिनी सिद्धी चाणे हिने मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा किशोर नैताम, डॉ प्रमोद काणेकर, प्रा प्राची वासनिक, प्रा प्रियंका गावंडे, डॉ अभिषेक चिमनकर, इशिका पिंपलकर व पंकज सोमकुवर यांनी केले.