राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पदभरती शिक्षण मंचच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे – डॉ. कल्पना पांडे
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून शिक्षकांच्या ९२ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. शिक्षण मंचच्या ५ वर्षाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे विद्यापीठात पदभरती होत असल्याची माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिक्षण मंचच्या अध्यक्ष डॉ. कल्पना पांडे यांनी दिली. शिक्षण मंचच्या पाठपुराव्यामुळे काढण्यात आलेल्या पदभरतीमुळे प्राध्यापक पदाकरिता पात्र असलेल्या उमेदवारांमध्ये उत्साह तसेच आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विद्यापीठाकडून सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदाकरिता जाहिरात काढण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून थांबलेली शिक्षकांची पदभरती आता पूर्ण होणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून विद्यापीठातील विविध विभागात व महाविद्यालयात शिकविणाऱ्या कंत्राटी तसेच शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये विद्यापीठ पदव्युत्तर शिक्षण विभागाकरिता प्राध्यापक १४, सहयोगी प्राध्यापक २२, सहाय्यक प्राध्यापक ३५, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाकरीता सहाय्यक प्राध्यापक २, बॅरिस्टर एस. के. वानखेडे शिक्षण महाविद्यालयासाठी सहाय्यक प्राध्यापक ६ आणि एलआयटीयू करीता प्राध्यापक ४, सहयोगी प्राध्यापक ३, सहाय्यक प्राध्यापक ६ अशी एकूण ९२ पदे भरण्याकरिता जाहिरात काढण्यात आली आहे. विद्यापीठ तसेच संलग्नित महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याचे नागपूर विद्यापीठ शिक्षण मंचांने सातत्याने उच्च शिक्षण मंत्र्यांना निदर्शनास आणून दिले आहे. शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची मागणी शिक्षण मंचने तत्कालीन उच्च शिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे यांच्याकडे केली होती. त्यानंतर सातत्याने निवेदन देत पदभरतीचा विषय रेटून धरला आहे. विद्यापीठाने काढलेली पद भरतीची जाहिरात म्हणजे शिक्षण मंचने सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्याला आज अंशतः यश मिळाले असल्याचे डॉ. कल्पना पांडे म्हणाल्या. विद्यापीठामध्ये रिक्त पदांवर मोठ्या प्रमाणात प्राध्यापकांची भरती होणार असल्याने नागपूर विद्यापीठ शिक्षण मंचच्या अध्यक्ष डॉ. कल्पना पांडे व समस्त पदाधिकारी यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, विद्यमान उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, तत्कालीन उच्च शिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे, तत्कालीन कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे आणि विद्यमान कुलगुरू डॉ. एस. आर. चौधरी यांचे आभार मानले.