राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार घोषित
विद्यापीठाचा शिक्षक दिन समारंभ गुरुवारी
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार घोषित करण्यात आले आहे. कॅम्पस चौक ते अंबाझरी टी पॉइंट मार्गावरील विद्यापीठाच्या गुरुनानक भवन येथे गुरुवार, दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११:३० वाजता आयोजित शिक्षक दिन समारंभात या पुरस्काराचे वितरण प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते केले जाणार आहे.
शिक्षक दिन समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान नागपूरचे संचालक डॉ प्रेम लाल पटेल यांची उपस्थिती राहणार आहे. समारंभाचे अध्यक्षस्थान प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे भूषविणार असून प्र-कुलगुरू डॉ संजय दुधे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या समारंभामध्ये डॉ आर कृष्णकुमार सुवर्णपदक तसेच उत्कृष्ट प्राचार्य, उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट संशोधक, उत्कृष्ट लेखक, उत्कृष्ट समाजकार्य पुरस्काराचे वितरण प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते केले जाणार आहे. विद्यापीठ संचालित/संलग्नित महाविद्यालयीन प्राचार्य मधून उत्कृष्ट प्राचार्यास डॉ आर कृष्णकुमार सुवर्णपदक दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या शिक्षक दिन समारंभात दिले जाते.
यावर्षी एस बी सीटी महाविद्यालय उमरेड रोड नागपूर येथील प्राचार्य डॉ सुजित गजाननराव मेत्रे यांना डॉ आर कृष्णकुमार सुवर्णपदक पुरस्कार घोषित झाला आहे.
उत्कृष्ट प्राचार्य (शहरी विभाग) पुरस्कार जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग हिंगणा रोडचे प्राचार्य डॉ सचिन पी उंटवाले, उत्कृष्ट प्राचार्य (ग्रामीण विभाग) सूर्योदय कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी विहीरगाव उमरेड रोड नागपूरचे प्राचार्य डॉ विठ्ठल गुलाबराव अराजपुरे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतून उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ नंदकिशोर एन करडे, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेतून मातृ सेवा संघ इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क नागपूर येथील डॉ प्रिन्स अजयकुमार तेजराम आगाशे, उत्कृष्ट संशोधक पुरस्कार (विद्यापीठ शैक्षणिक विभागातून) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधी निर्माणशास्त्र विभागातील डॉ विना एस बेलगमवार, उत्कृष्ट संशोधक पुरस्कार (विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातून) सेंट विन्सेंट पलोटी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी गावसी मानापूर वर्धा रोड नागपूर येथील डॉ मिनहाज अहमद ए. रहमान, उत्कृष्ट लेखक पुरस्कार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ग्रंथालय आणि माहीतीशास्त्र विभागातील डॉ शालिनी आर लिहितकर तर उत्कृष्ट समाजकार्य पुरस्कार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवसाय प्रबंधन विभागातील डॉ राहुल श्याम खराबे यांना घोषित झाला आहे.
प्रस्तुत कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ राजू हिवसे यांनी केले आहे.