राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ऑरेंज ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांना सुरुवात
समाजातील सर्व घटकांसाठी खेळाचे दालन खुले
– प्र- कुलगुरु डॉ. संजय दुधे यांचे प्रतिपादन
नागपूर : (२४-११-२०२३) ऑरेंज ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांसाठी खेळाचे दालन खुले केले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी केले. ऑरेंज ऑलिम्पिक टीम आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने ऑरेंज ऑलिम्पिक स्पर्धा- २०२३ चे आयोजन गुरुवार, दिनांक
२३ नोव्हेंबर ते मंगळवार, २८ नोव्हेंबर २०२३ दरम्यान विद्यापीठ क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. स्पर्धेच्या उद्घाटनीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. दुधे मार्गदर्शन करीत होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यंदा आपले शताब्दी महोत्सव साजरे करीत आहे. शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त या उपक्रमाचे आयोजन ऑरेंज ऑलिम्पिक टीमच्या वतीने करण्यात आले आहे. उद्घाटनीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरु डॉ संजय दुधे, प्रमुख अतिथी म्हणून व्हीएनआयटीचे संचालक डॉ. प्रमोद पडोळे, आंतरराष्ट्रीय खेळाडू रितिका ठक्कर, विद्यापीठ क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी, नागपूर जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष श्री गुरुदेव नगराळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. अध्यक्षीय स्थानावरून पुढे बोलताना डॉ. दुधे यांनी ही स्पर्धा दिव्या चावला यांच्या संकल्पनेतून होत असल्याचे सांगितले. त्यांच्या या संकल्पनेमुळे शालेय विद्यार्थी विद्यापीठाच्या या भव्य क्रीडा संकुलावर आले आहे. शताब्दी वर्षानिमित्त विद्यापीठ ग्राम चलो अभियान (रिचिंग टू अनरीच्ड) हा उपक्रम राबवित आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विद्यापीठ पोहोचावे हा या अभियानामागील हेतू आहे. शालेय विद्यार्थी विविध खेळांमध्ये पुढे यावे. खेळाप्रती उत्साह असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात. त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व करीत ऑलम्पिकमध्ये सहभागी व्हावे, असे दुधे म्हणाले. विद्यापीठ परिक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऑरेंज ऑलिंपिक स्पर्धा व्हावी. त्याचप्रमाणे नागपूर पासून अन्य जिल्ह्यांनी प्रेरणा घ्यावी असे ते म्हणाले.
प्रमुख अतिथी व्हीएनआयटीचे संचालक डॉ. प्रमोद पडोळे यांनी ऑरेंज ऑलिंपिक स्पर्धेमुळे खेळाचे वातावरण तयार होती होईल. खेळाडूंना मोठा मंच उपलब्ध करून दिल्याने त्यांनी विद्यापीठाचे धन्यवाद मानले. २०-२० क्रिकेट स्पर्धा माहित नसताना देखील त्याकाळी आम्ही ट्वेंटी-ट्वेंटी स्पर्धा खेळत होतो. व्हीएनआयटी येथे रुजू झाल्यानंतर क्रिकेटसाठी वातावरण निर्माण केल्याची माहिती त्यांनी दिली. सोबतच खेळाडूंना विनंती करून कोणतीही मदत देण्याची तयारी त्यांनी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय खेळाडू रितिका ठक्कर यांनी मार्गदर्शन करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हे प्रत्येक ॲथलेटिक्सला मदत करत असल्याचे सांगितले. खेळ प्रत्येकासाठी महत्त्वपूर्ण असून त्यामुळे उत्तम आरोग्य तर राहतेच शिवाय शिस्त देखील राहत असल्याचे त्या म्हणाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटण्याचा जीवनातील महत्त्वपूर्ण क्षण असल्याचे सांगत सर्व खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक करताना स्पर्धेच्या संयोजक दिव्या चावला यांनी स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका सांगितली. नागपूर येथील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून याचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम तुमचा आहे जिंकण्याची सवय लावा असे त्या म्हणाल्या. शुभेच्छा देताना विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ संचालक डॉ. शरद सूर्यवंशी यांनी रिचिंग टू अनरीच्ड उपक्रमाची माहिती देत विद्यापीठ समाजातील सर्व घटकांना खेळाच्या सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. तत्पूर्वी स्पर्धेतील सहभागी खेळाडूंनी प्रमुख अतिथींना मानवंदना दिली. प्रमुख अतिथींच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. उद्घाटन या कार्यक्रमाचे संचालन अर्चना कोट्टेवार यांनी केले तर आभार केतन कावरे यांनी मानले. यावेळी डॉ. आदित्य सोनी, डॉ. सोनाली शिरभाते, डॉ. विवेकानंद सिंग यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
विविध स्पर्धांचे आयोजन
या शालेय स्पर्धेत टेबलटेनिस, बॅडमिंटन आणि अॅथलेटिक्स या खेळाचा समावेश राहणार आहे. नागपूर जिल्हा अॅथलेटिक्स संघटना, नागपूर जिल्हा बॅडमिंटन संघटना तसेच नागपूर जिल्हा टेबलटेनिस संघटनेच्या मार्गदर्शनात या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. सर्व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र तर विजेत्या खेळाडूंना पदक देउन सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट शाळांनाही चषक देउन सन्मानित करण्यात येणार आहे. नागपूरातील ५० हून अधिक शाळांमधून सुमारे एक हजार विद्यार्थी यात सहभागी होत आहे.
स्पर्धेच्या भव्य आयोजनासाठी महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष मंगेश काशीकर यांच्या मार्गदर्शनात बॅडमिंटन खेळाचे तर अॅड. आशुतोष पोतनीस यांच्या नेतृत्वात टेबल टेनिसचे आणि जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष गुरुदेव नगराळे यांच्या मार्गदर्शनात अॅथलेटिक्स खेळाचे नियोजन आहे.