राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ सांस्कृतिक संघ निवड चाचणी सुरु
प्राथमिक निवड चाचणी १९ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०२४ पर्यंत
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सांस्कृतिक संघाची प्राथमिक निवड चाचणी गुरुवार, दिनांक १९ सप्टेंबर ते शनिवार, दिनांक २१ सप्टेंबर २०२४ पर्यंत आयोजित करण्यात आली आहे. महाराज बाग चौक जवळ विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराज मुख्य प्रशासकीय परिसरातील दीक्षांत सभागृहात ही निवड चाचणी आयोजित केली जाणार आहे.
प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे, प्र-कुलगुरू डॉ संजय दुधे, कुलसचिव डॉ राजू हिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास विभागाच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये विद्यार्थी सहभागी होतात. राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य, मध्य विभागीय आंतर विद्यापीठ युवा महोत्सव व राष्ट्रीय स्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यापीठाच्या सांस्कृतिक संघाची या चाचणीतून निवड केली जाणार आहे.
राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य सांस्कृतिक युवा महोत्सव, आंतर विद्यापीठ मध्य विभागीय व राष्ट्रीय सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन नोव्हेंबर/ डिसेंबर महिन्यात प्रस्तावित आहे. विद्यापीठाचा सांस्कृतिक संघ वेगवेगळ्या २६ सांस्कृतिक कार्यक्रम प्रकारामध्ये भाग घेत असतो. एकूण ४० कलावंत विद्यार्थी व त्यांचे इतर सहकारी या स्पर्धेत सहभागी होतात. सदर स्पर्धेकरिता विद्यापीठाच्या संघाची सत्र २०२४-२५ साठी ही निवड चाचणी घेतली जाणार आहे. संगीत, नृत्य, नाटक, साहित्यिक आणि ललित कला प्रकारात विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
प्राचार्यांचे पत्र व ओळखपत्र घेऊन नमूद वेळेत एक तास पूर्वी विद्यार्थ्यांना उपस्थित राहून नोंदणी करावयाची आहे. विद्यार्थ्यांना ओळखपत्र आणणे अनिवार्य आहे. निवड चाचणीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय १ जुलै २०२४ रोजी २५ वर्षापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थी कलावंत हा वरिष्ठ महाविद्यालयाचा पूर्णवेळ अभ्यासक्रमाचा नियमित विद्यार्थी असावा. सर्व विद्यार्थी कलावंतांनी आपले सादरीकरण करण्याकरिता लागणारे वाद्य, साहित्य इतर उपकरणे व साथसंगत आपल्या सोबत आणावे. प्रत्येक महाविद्यालयाने एका स्पर्धेसाठी एकच संघ किंवा विद्यार्थी कलाकार पाठवावा. परंतु एकच विद्यार्थी विविध स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतो.
अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या निवड चाचणीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ विजय खंडाळ यांनी केले आहे.