राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात UDRF तज्ञ समितीने दिली विद्यापीठाला भेट

विद्यापीठात युडीआरएफ शैक्षणिक आढावा

नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने विद्यापीठ विभागीय क्रमवारी आराखडा (University Department Ranking Framework – UDRF) अंतर्गत शैक्षणिक आढावा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. युडीआरएफ तज्ञ समितीने मंगळवार २४ जून व बुधवार २५ जून रोजी विद्यापीठाला भेट देत सर्व शैक्षणिक विभागांचा आढावा घेतला. गुणवत्तात्मक वृद्धी आणि शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी विद्यापीठाने उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University: UDRF expert committee visits the university

यावेळी प्रभारी कुलगुरू डॉ माधवी खोडे चवरे भाप्रसे प्रभारी प्र-कुलगुरू डॉ सुभाष कोंडावार कुलसचिव डॉ. राजू हिवसे, समितीचे अध्यक्ष गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नामदेवराव कल्याणकर, तर आयजीएनटीयु अमरकंटक येथील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. आलोक श्रोत्रीय, सीएसआयआर-सीआयएमएफआर नागपूर येथील वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. ए. के. रैना, म्हैसूर विद्यापीठ, कर्नाटक पृथ्वी विज्ञान विभागातील डॉ. डी. नागार्जुन, टीसीएस मिहान नागपूर येथील सेंटर हेड अरविंद कुमार, व्हीआयए नागपूर येथील औद्योगिक सल्लागार डॉ. अनीता राव, सीएसआयआर निरी नागपूर येथील प्रधान वैज्ञानिक डॉ. अवनीश अंशुल यांचा सदस्य म्हणून समितीत समावेश होता.

राष्ट्रीय मानकांशी सुसंगत विद्यापीठातील सर्व पदव्युत्तर शैक्षणिक विभागांच्या कार्यक्षमतेचा वस्तुनिष्ठ पद्धतीने तज्ञ समितीकडून आढावा घेण्यात आला. या शैक्षणिक आढाव्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, वरिष्ठ वैज्ञानिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विशेषज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली होती. समितीत वरील तज्ञ व्यक्तींचा समावेश होता. काही दिवसांच्या सखोल विश्लेषणादरम्यान समितीने विभागांनी सादर केलेली कागदपत्रे, अहवाल, शैक्षणिक आढावा, संशोधन प्रकाशने यांची काटेकोरपणे तपासणी केली. शिक्षकांचे सर्वोत्कृष्ट योगदान, संशोधन आणि व्यावसायिक कृती, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) उपक्रम, अध्यापन आणि मूल्यमापन प्रक्रिया आदी पाच प्रमुख विषयावर शैक्षणिक विभागांचे मूल्यमापन करण्यात आले. विभागीय प्रशासन आणि सर्वोत्तम कार्यपद्धती, विद्यार्थी सहाय्य, प्रगती आणि प्राप्ती, परिषद, कार्यशाळा आणि सहकार्य उपक्रमांच्या आधारे प्रत्येक शैक्षणिक विभागांचे एनआयआरएफ, नॅक आणि एनइपी २०२० च्या मापदंडानुसार सखोल पद्धतीने मूल्यांकन करण्यात आले.

भेटी दरम्यान नोंदविण्यात आलेली निरीक्षणे आणि कृतीक्षम शिफारशी समितीच्या सदस्यांनी समारोपीय सत्रात मांडल्या. अरविंद कुमार (TCS मिहान) यांनी सशक्त माजी विद्यार्थी साखळी निर्माण करण्याचे महत्त्व, उद्योगांशी भागीदारी, तसेच इंटर्नशिप आणि ऑन-द-जॉब ट्रेनिंग (OJT) संधी ओळखण्यावर भर दिला. शोधपत्रे व बौद्धिक संपदा हक्क (IPR) यांचे व्यावसायिकीकरण करण्याची गरज अरविंद कुमार यांनी अधोरेखित केली. डॉ. डी. नागार्जुन (म्हैसूर विद्यापीठ) यांनी प्रत्येक प्राध्यापकाने वर्षाला किमान तीन दर्जेदार संशोधन लेख प्रकाशित करावेत, असे सुचवले. त्यांनी संयुक्त आणि संघात्मक संशोधन वाढवण्याचे आवाहन केले. मानव्यशास्त्र आणि समाजशास्त्र विभागांनी देखील Scopus / Web of Science सूचीबद्ध जर्नलमध्ये लेखन करावे व कॉपीराईट/पेटंट यांचा योग्य वापर करावा, असे सांगितले. पुस्तकांचे अनुवाद व शैक्षणिक साहित्याची पुनर्रचना ही सुद्धा महत्त्वपूर्ण शैक्षणिक कामगिरी ठरते, असे ते म्हणाले.

डॉ. ए. के. रैना यांनी जिज्ञासा आणि प्रश्न विचारण्याची सवय ही आधुनिक अध्यापनाचा अविभाज्य भाग असावी, असे प्रतिपादन केले. त्यांनी गंभीर विचार आणि शोधप्रधान शिक्षणपद्धती अंगीकारण्याचे आवाहन केले. समारोपात समितीचे अध्यक्ष डॉ. नामदेव कल्याणकर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने केलेले काळजीपूर्वक नियोजन, कागदपत्र सादरीकरण व प्रभावी अंमलबजावणीबद्दल प्रशंसा केली. औषधी निर्माणशास्त्र विभाग, भौतिकशास्त्र विभाग आणि रसायनशास्त्र विभागातील संशोधन, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शैक्षणिक प्रथा यांचे विशेष कौतुक केले.

कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात समितीच्या सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, युडीआरएफ ही केवळ क्रमवारीसाठी नव्हे तर पारदर्शकता, जबाबदारी आणि गुणवत्ता वृद्धीसाठीची एक रणनीतिक सुधारणा योजना आहे. सर्व विभागांनी या शिफारशी गांभीर्याने घेत गुणात्मक प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

युडीआरएफ शैक्षणिक आढावा हा महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण सुधारणा दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. संस्थात्मक मूल्यमापन व भविष्यानुकूल नियोजनासाठीचे एक प्रभावी पाऊल ठरले आहे. या उपक्रमाचे निष्कर्ष विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमीत मजबुती आणतील आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शैक्षणिक क्रमवारीत विद्यापीठाची स्थिती उंचावतील, असे सांगितले. हा संपूर्ण उपक्रम अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) संचालक डॉ. स्मिता आचार्य यांच्या नेतृत्वात, विविध संकुलांचे अधिष्ठाते, विभागप्रमुख आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या राबविण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com