आंतरविद्यापीठ आविष्कार स्पर्धेसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा चमू रवाना
नागपूर : डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणारे येथे १२ ते १५ जानेवारी २०२५ दरम्यान आयोजित आंतर विद्यापीठ आविष्कार स्पर्धेसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची चमू रवाना झाली आहे. विद्यापीठाच्या महाराज बाग स्थित छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसरात शुक्रवार, दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी आयोजित कार्यक्रमात प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांच्या शुभहस्ते हिरवी झेंडी दाखवून चमूला रवाना करण्यात आले.
यावेळी अधिसभा सदस्य विष्णू चांगदे, विद्यार्थी विकास विभाग प्रभारी संचालक डॉ. विजय खंडाळ, आविष्कार समन्वयक डॉ. संजय ढोबळे, डॉ. अभय देशमुख, डॉ. मंजू दुबे व डॉ. निलेश आवटे यांची उपस्थिती होती. विद्यापीठ स्तरावर जिल्हा निहाय आंतर महाविद्यालयीन अविष्कार स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यातील सर्वोत्कृष्ट मॉडेल्सची निवड करीत जी एच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यापीठ स्तरीय अविष्कार स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले.
विद्यापीठ स्तरावर घेण्यात आलेल्या आविष्कार संशोधन महोत्सवात तब्बल ३५१ प्रकल्पांची नोंदणी केली होती. यातील उत्कृष्ट ४८ संशोधन प्रकल्पांची निवड डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे रायगड येथे १२ ते १५ जानेवारी २०२५ दरम्यान आयोजित राज्यस्तरीय अविष्कार संशोधन महोत्सवासाठी करण्यात आली होती.
आंतर विद्यापीठ अविष्कार स्पर्धेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. राजेंद्र काकडे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, विद्यार्थी विकास विभाग प्रभारी संचालक डॉ. विजय खंडाळ यांनी शुभेच्छा दिल्या आहे.