राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आता ‘स्कूल ऑफ लॉ’
डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय आणि पदव्युत्तर विधी विभागाचे एकत्रीकरण
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे ऐतिहासिक पाऊल
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आता ‘स्कूल ऑफ लॉ’ सुरू होणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय आणि पदव्युत्तर विधी विभाग एकत्रित करून ‘स्कूल ऑफ लॉ’ सुरू करण्याबाबत विद्यापीठाने अधिसूचना जाहीर केली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सवी वर्षात विद्यापीठाने घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) ची अंमलबजावणी करण्यासाठी विद्यापीठात नवनवीन अभ्यासक्रम आणण्याचा प्रयत्न मागील दोन वर्षांपासून सुरू होता. विद्यापीठातील ४० ते ५० पदव्युत्तर शैक्षणिक विभागांचे विविध स्कूल्समध्ये रूपांतर करण्याचा मानस आहे. त्या दिशेने पहिले पाऊल उचलत डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय आणि पदव्युत्तर विधी विभाग यांना एकत्रित करण्यासंदर्भात प्रभारी कुलगुरू डॉ माधवी खोडे चवरे (भाप्रसे), प्र-कुलगुरु डॉ सुभाष कोंडावार व कुलसचिव डॉ राजू हिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

राज्यपाल नामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ समय बनसोड यांनी ‘स्कूल ऑफ लाॅ’ तातडीने सुरू होण्याबाबत पुढाकार घेतला. त्यामुळे विद्यापीठात आता एकाच ठिकाणी पदवी, पदव्युत्तर ते पीएचडी असा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास सुकर होणार आहे. नागपूरात नॅशनल लॉ कॉलेज, सिम्बॉयसिस लाॅ कॉलेज यासह देशभरात २० नॅशनल स्कूल ऑफ लॉ निर्माण झाले आहेत. या स्पर्धेत टिकून राहण्याकरिता १०० वर्ष पूर्ण केलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाला देखील या श्रेणीत आणणे गरजेचे होते. असा प्रस्ताव विविध समिती विविध प्राधिकरणांतून मान्य होत व्यवस्थापन परिषदेने देखील मागील वर्षीच या विषयाला मान्यता दिली होती. याबाबत स्ट्यॅट्यूट तसेच अन्य बाबी पूर्ण करीत अधिसूचना काढत विद्यापीठाने आता मोठे पाऊल उचलले आहे. विद्यापीठाचे ‘स्कूल ऑफ लॉ’ आता राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळविण्यासाठी सज्ज झाले आहे.
विद्यापीठाच्या या निर्णयामुळे प्रशासकीय खर्चात देखील बचत होणार आहे. पदवी आणि पदव्युत्तरचे वर्ग एकाच ठिकाणी घेता येईल. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ श्रीकांत कोमावार यांनी याकरिता प्रयत्न सुरू केले होते. दिवंगत कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांनी देखील ‘स्कूल ऑफ लाॅ’ निर्माण करण्याकरिता प्रयत्न केले होते. विद्यापीठात ‘स्कूल ऑफ लॉ’ निर्माण होत असल्याने माजी न्यायमूर्ती, शहरातील विधी क्षेत्रातील गणमान्य व्यक्तींनी आनंद व्यक्त केला आहे. शताब्दी महोत्सवी वर्षात ‘स्कूल ऑफ लॉ’ निर्माण होत असल्याचा आनंद प्राचार्य डॉ रवीशंकर मोर यांनी व्यक्त केला. नवीन जबाबदारी देखील पूर्ण करू, असा मानस त्यांनी व्यक्त केला.