शिवाजी विद्यापीठातर्फे १४ मार्चपासून राजर्षी शाहू संगीत रजनीचे आयोजन
राम गणेश गडकरी सभागृहात होणार कार्यक्रम
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागातर्फे येत्या १४ व १५ मार्च रोजी राजर्षी शाहू संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले आहे. या संगीत रजनीसाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु, प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. दररोज सायंकाळी ५.३० वाजता सुरु होणाऱ्या या संगीत रजनीचे आयोजन पेटाळा येथील राम गणेश गडकरी सभागृहात करण्यात आले आहे. सन १९९१ ते जवळजवळ २००२ अशी सलग १२ वर्षे या संगीतरजनीचे संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारतरत्न पंडीत भिमसेन जोशी, गानसरस्वती किशोरीताई आमोणकर, पंडीत राजन साजन मिश्रा, उस्ताद रशीद खान यांसारख्या दिग्गज आंतरराष्ट्रीय कलाकारांनी आपली गानकला सादर केली होती. हीच परंपरा पुढे अखंडित राहावी, या उद्देशाने यावर्षी राजर्षी शाहू संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले आहे.
कोल्हापूरला शास्त्रीय गायनाची परंपरा आहे, तसेच या सर्व कलांना राजाश्रय देणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने राजर्षी शाहू संगीत रजनीचे आयोजन शिवाजी विद्यापीठ संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या वतीने होणाऱ्या या संगीत रजनीमध्ये कोल्हापूरातील तसेच, बाहेरील नामवंत कलाकारांचा समावेश आहे. ही दोन दिवसीय संगीत रजनी चार सत्रांमध्ये होईल. १४ मार्चला पहिल्या सत्रामध्ये पुण्याचे कृष्णा साळुंके व रोहीत खवळे यांचा पखवाजरंग हा पखवाजवादनाच्या जुगलबंदीचा कार्यक्रम होईल. दुसऱ्या सत्रामध्ये कोल्हापूरातील प्रसिध्द हार्मोनियम वादक पंडीत गोविंदराव टेंबे यांच्या व्यक्तीमत्वाचा शोध घेणारा गुणीगोविंद हा कार्यक्रम होईल. याची संकल्पना व निर्मिती संगीताचार्य पंडीत सुधीर पोटे यांची असणार आहे. यामध्ये पंडीत सुधीर पोटे, गौरी कुलकर्णी व गौरी पाटील यांचे गायन होणार आहे.
१५ मार्च, २०२४ रोजी प्रथम सत्रात कोल्हापुरातील नवोदित शास्त्रीय गायिका गौतमी चिपळुणकर तर द्वितीय सत्रामध्ये आंतरराष्ट्रीय किर्तीच्या गायिका विदुषी अनुराधा कुबेर (पुणे) यांचे गायन होणार आहे.