आर सी पटेल अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी ‘स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२५’मध्ये ‘स्मार्ट फ्लश सिस्टम’ द्वारे जलसंवर्धनासाठी दिला नवा दृष्टिकोन

शिरपूर : आर सी पटेल स्वायत्त अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी कोईम्बतूर, तामिळनाडू येथे राष्ट्रीय स्तरावरील उपक्रम ‘ग्रँड फायनल: स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२४’ मध्ये सहभाग घेत हार्डवेअर श्रेणीअंतर्गत  पाणी बचतीसाठी ‘स्मार्ट फ्लश सिस्टम’ हा अभिनव प्रकल्प सादर करून जलसंवर्धनासाठी तांत्रिक दृष्ट्या नवा दृष्टिकोन प्राप्त करवून दिल्याची माहिती महाविद्यालयाचे संचालक प्रा डॉ जे बी पाटील यांनी दिली.

R C Patel Engineering students present a new approach at Smart India Hackathon

‘ग्रँड फायनल: स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२४’ हा प्रतिष्ठित राष्ट्रीय स्तरावरील उपक्रम तामिळनाडू येथील कोईम्बतूर इनोव्हेशन अँड बिझनेस इन्क्युबेटर (फोर्ज इन्क्युबेशन) येथे १०-१५ डिसेंबर२०२४ आयोजित करण्यात आला होता. उद्घाटन कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’ मध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांना संबोधित केले. कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ अखिल भारतीय तंत्र शिक्षण संचालनालय (AICTE), नवी दिल्ली चे अध्यक्ष प्रा. डॉ. टी. जी. सीताराम यांच्या प्रेरणादायी भाषणाने झाला. त्यांनी अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना समस्यांचे सर्जनशील समाधान शोधण्याची संधी मिळते, असे प्रतिपादन केले. आर. सी. पटेल स्वायत्त अभियांत्रिकीच्या यंत्र अभियांत्रिकी संघाने  पाणी बचतीसाठी ‘स्मार्ट फ्लश सिस्टम’ नामक  प्रणाली विकसित केली.

सदर प्रणाली फ्लशसाठी आवश्यक पाण्याचे प्रमाण स्वयंचलितपणे ठरवते आणि दरवर्षी हजारो लिटर पाणी वाचवण्यास सक्षम आहे. ‘स्मार्ट फ्लश सिस्टम’ पारंपरिक फ्लशच्या तुलनेत फारच  अत्याधुनिक आहे. पारंपरिक फ्लश एका वेळी ८-१२ लिटर पाणी वापरतो, तर स्मार्ट फ्लश फक्त प्रेशरने ५०-७०% पाणी वाचवतो. तसेच, पारंपरिक फ्लशच्या तुलनेत ‘स्मार्ट फ्लश’ ९०% कमी वीज वापरतो, ज्यामुळे ऊर्जा बचतही होते. कमी देखभाल आणि टिकाऊपणा यामुळे हि प्रणाली अधिक प्रभावी ठरते. या तंत्रज्ञानामुळे ग्रामीण भागातील पाण्याच्या कमतरतेची समस्या कमी करण्यास मदत होईल. हे केवळ पाणी वाचवण्याचे तंत्रज्ञान नाही, तर पर्यावरण संरक्षण आणि आरोग्य सुधारण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. शाळा, सार्वजनिक स्वच्छतागृहे, कारखाने यांसारख्या ठिकाणीही याचा वापर करता येईल.

Advertisement

या संघाचे नेतृत्व मेकॅनिकल अभियांत्रिकी विद्याशाखेचा विद्यार्थी चेतन रवींद्र पाटील याने केले असून उज्वल नरेंद्रसिंग जाधव, धनंजय जाधव चौधरी, तेजस्विनी रमेश सोनवणे, यशश्री कमलेश पाटील आणि मेघना प्रभाकर बोरसे यांनी प्रकल्पाच्या सर्व तांत्रिक बाबी कौशल्याने हाताळल्या. स्पर्धेदरम्यान ज्युरी पॅनेलने या प्रोटोटाइपचे सखोल मूल्यांकन केले आणि विद्यार्थ्यांना पुढील सुधारणा व व्यावसायिक अंमलबजावणीसाठी मौल्यवान मार्गदर्शन केले. त्यांनी प्रकल्पाच्या उपयुक्ततेबद्दल विशेष कौतुक देखील केले आणि या प्रणालीमुळे जलसंवर्धनासाठी महत्त्वपूर्ण योगदान प्राप्त होण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी सहभागी संघांना प्रमाणपत्रे आणि ट्रॉफी प्रदान करून गौरवण्यात आले.

‘स्मार्ट फ्लश सिस्टम’ साठी आर. सी. पटेल स्वायत्त अभियांत्रिकीच्या संघाला विशेष प्रशस्तीपत्र मिळाले, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या कष्टांचे व कल्पकतेचे कौतुक झाले. मार्गदर्शक प्राध्यापक डॉ. हेमराज कुमावत आणि प्रा. निलेश शिंदे म्हणाले की विद्यार्थ्यांनी दाखवलेली कल्पकता आणि तांत्रिक कौशल्य यामुळे अशा समस्यांसाठी प्रभावी उपाय साकारता येतात. स्मार्ट इंडिया हॅकाथॉनसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळते.

विद्यार्थ्यांच्या या राष्ट्रीय स्तरावरील यशाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, माजी नगराध्यक्षा व संचालक जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक चिंतनभाई पटेल, सचिव रेषा पटेल, संचालक अतुल भंडारी, महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील, उपसंचालक डॉ. पी. जे. देवरे, परीक्षा नियंत्रक प्रा.सुहास शुक्ल, विभाग प्रमुख डॉ. व्ही. एस. पाटील, प्रा. पी. एल. सरोदे, प्रा. जी. व्ही. तपकिरे, डॉ. एस. व्ही. देसले, डॉ. आर. बी. वाघ, डॉ. डी. आर. पाटील, डॉ. उज्वला पाटील, डॉ. एस. ए. पाटील, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. एम. पी. जैन, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page