IIT मुंबई ‘टेकफेस्ट 2025’ मध्ये आर. सी. पटेल स्वायत्त अभियांत्रिकीचा झंझावात
IIT Bombay Techfest 2025 मध्ये आर. सी. पटेल स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘इंजेनियम ड्राईव्ह्स’ संघाने रोबो वॉर स्पर्धेत रशियन संघावर विजय मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.
आशियातील सर्वात मोठ्या टेकफेस्टमध्ये रशियन संघावर मात; रोबो वॉर स्पर्धेत तृतीय क्रमांक
शिरपूर : आशियातील सर्वात मोठा तंत्रज्ञान महोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या IIT मुंबई येथील ‘टेकफेस्ट–2025’ मध्ये शिरपूरच्या आर. सी. पटेल स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश संपादन करत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली आहे.
महाविद्यालयाच्या ‘इंजेनियम ड्राईव्ह्स’ या संघाने ३० किलो आंतरराष्ट्रीय कॉम्बॅट रोबोटिक्स (Robo War) स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत ₹26,000 चे रोख पारितोषिक मिळवले. विशेष म्हणजे या स्पर्धेत भारतीय संघांसह आंतरराष्ट्रीय संघांनी सहभाग घेतला होता. अशी माहिती महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील यांनी दिली.
भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), मुंबई तर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या टेकफेस्टची सुरुवात 1998 साली झाली असून, यंदा टेकफेस्टचे 29 वे वर्ष होते. 20 ते 23 डिसेंबर 2025 दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत संरक्षण, अवकाश विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वयंचलित वाहने आणि रोबोटिक्स या अत्याधुनिक क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला होता. यामध्ये जगभरातील 35 हून अधिक आंतरराष्ट्रीय संघ सहभागी झाले होते.
या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आर. सी. पटेल स्वायत्त अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. संघामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील अनुराग जमादार, प्रेमकुमार पाटील आणि कॉम्प्युटर इंजिनीअरिंग विभागातील चैतन्य पाटील यांचा समावेश होता. संघाने 8, 15, 30 आणि 60 किलो वजनाच्या डिफेन्स व अटॅक प्रकारच्या रोबोट्ससह स्पर्धेत भाग घेतला.

स्पर्धेतील लीग व नॉकआउट फेऱ्यांमध्ये संघाने सातत्यपूर्ण विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. ३० किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत शिरपूरच्या संघाची गाठ रशियाच्या ‘वाईल्डबोट’ या तगड्या आंतरराष्ट्रीय संघाशी पडली. अत्यंत अटीतटीच्या या सामन्यात आर. सी. पटेलच्या विद्यार्थ्यांनी रशियन संघाचा पराभव करत प्रेक्षकांची मने जिंकली.
उपांत्य फेरीत उत्तर प्रदेशच्या ‘यूपी-15’ या संघासोबत झालेल्या चुरशीच्या लढतीत तांत्रिक कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन करत संघाने तृतीय क्रमांक मिळवला.
तज्ज्ञांच्या मते, या प्रकारच्या रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर भविष्यात संरक्षण, लष्कर, स्फोटक शोध, सीमावर्ती सुरक्षा, औद्योगिक सुरक्षा आणि अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. टेकफेस्टसारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठामुळे AI आणि रोबोटिक्स क्षेत्रातील संशोधनाला नवी दिशा मिळत आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे महाविद्यालयातील अत्याधुनिक प्रयोगशाळा, आधुनिक तांत्रिक सुविधा आणि प्राध्यापकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन असल्याचे सांगण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थीही योग्य संधी व मार्गदर्शन मिळाल्यास जागतिक स्तरावर चमकू शकतात, याचे हे उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, ट्रस्टी जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक चिंतनभाई पटेल, सचिव रेषा पटेल, संचालक अतुल भंडारी, प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील, उपसंचालक डॉ. पी. जे. देवरे तसेच सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
