पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात त्रिशताब्दी जयंती सप्ताहास प्रारंभ
अहिल्यादेवींनी सर्वसमावेशक राज्यकारभार पाहिला – कुलगुरू डॉ महानवर
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्वसामावेशक राज्यकारभार पाहिला. त्याचप्रमाणे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या माध्यमातून सर्वांना सोबत घेऊन सर्व समावेशक कामकाज करण्यात येईल, अशी ग्वाही कुलगुरू प्रा डॉ प्रकाश महानवर यांनी दिली.





सोमवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवानिमित्त दि. 26 ते 31 मे 2025 दरम्यान आठवडाभर आयोजित विविध कार्यक्रमांचे उद्घाटन कुलगुरू प्रा प्रकाश महानवर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू प्रा डॉ लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ अतुल लकडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ केदारनाथ काळवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत अध्यासन केंद्राचे संचालक डॉ प्रभाकर कोळेकर यांनी केले. यावेळी आरोग्य शिबिराचेही उद्घाटन करण्यात आले. यामध्ये रक्ताच्या विविध तपासणी मोफत केले जाणार आहेत. वैद्यकीय अधिकारी डॉ अभिजीत जगताप यांच्या पथकाकडून या शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे.
कुलगुरू प्रा महानवर म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त विद्यापीठाकडून आठवडाभर भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जेणेकरून अहिल्यादेवींचा आदर्श कारभार, त्यांचे आचार, विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचेल. आज आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले. चांगले आरोग्य असेल तरच आपण सर्व काही करू शकतो. त्यासाठी सर्वांनी आरोग्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन कुलगुरू प्रा महानवर यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमास व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा देवानंद चिलवंत, राजाभाऊ सरवदे, सिनेट सदस्य तथा भाजपच्या अध्यक्ष रोहिणी तडवळकर, प्रभारी अधिष्ठाता डॉ वसंत कोरे, मल्लिनाथ शहाबादे यांच्यासह विविध प्राधिकरणाचे सदस्य, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा ममता बोल्ली व प्रा श्रुती देवळे यांनी केले तर आभार डॉ केदारनाथ काळवणे यांनी मानले.