पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील प्रतीक उग्राल यास भारत सरकारचे रु दोन लाखांचे पारितोषिक

सोलापूर : भारत सरकारच्या Statistics and Programme Implemenetation (MoSPI) मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या Data Visualisation Hackathon या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संगणकशास्त्र संकुलातील संख्याशास्त्र अधिविभागाचा प्रतीक राजेश उग्राल हा विद्यार्थी प्रथम आला आहे. या स्पर्धेसाठी देशातील आयआयटी, आयआयएम, कलकत्ता विद्यापीठ, IISER, BITS Pilani अशा विविध नामांकित संस्थेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये सहभागींनी नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन (NSSO) सारख्या राष्ट्रीय संस्थांनी गोळा केलेल्या डेटाचे संख्याशास्त्रीय विश्लेषण करून सुलभ आकलनासाठी सदरचा डेटा चित्ररूपात सादर करावयाचा होता. प्रतीक उग्राल या विद्यार्थ्याने महागाईचा कल (Inflation Trends) संख्याशास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून यावरील सादरीकरण मंत्रालयाला पाठविले होते.

प्रतीकच्या सादरीकरणाला प्रथम क्रमांक मिळाला असून बक्षिसाचे स्वरूप प्रमाणपत्र व रु २,००,०००/- असे आहे. या सादरीकरणासाठी प्रतीकला संख्याशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक चंद्रकांत गार्डी, ख़ुशी खडलोया, निकिता गाटे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यापीठाचे कुलगुरु प्रा प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ अतुल लकडे तसेच संगणकशास्त्र संकुलाचे संचालक डॉ राजीवकुमार मेंते, डॉ ज्योती माशाळे, डॉ अशोक शिंदे, डॉ श्रीराम राऊत, प्रा विकास घुटे यांनी प्रतीकचे अभिनंदन केले. या यशाबद्दल प्रतीकचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com