पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा १० जानेवारीला २० वा दीक्षांत समारंभ
राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची उपस्थिती राहणार
15 हजार 219 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान होणार
71 संशोधकांना पीएच डी पदवी तर 57 सुवर्णपदकाचेही वितरण होणार
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 20 वा दीक्षांत समारंभ शुक्रवार, दि 10 जानेवारी 2025 रोजी सकाळी अकरा वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत मैदानात होणार असून यावेळी एकूण 15 हजार 291 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा डॉ प्रकाश महानवर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. याचबरोबर 71 संशोधक विद्यार्थ्यांना पीएच डी पदवी तर 57 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे. या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबईचे कुलपती प्रा जे बी जोशी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. प्रारंभी सकाळी साडेदहा वाजता प्रशासकीय इमारतीपासून ते दीक्षांत मंडपापर्यंत दीक्षांत मिरवणूक निघणार आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ श्रीकांत अंधारे हे ज्ञानदंड हाती घेऊन मिरवणुकीच्या अग्रभागी असणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात होईल. या समारंभात वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, मानवविज्ञान विद्याशाखा, आंतर विद्याशाखा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना पदवी देऊन सन्मानित करण्यात येईल.
यावर्षी 71 विद्यार्थ्यांना पीएच डी पदवी प्रदान केली जाणार आहे. त्याचबरोबर यंदा 57 विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. विविध विषयात गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना देणगीदारांनी दिलेल्या रकमेतून सुवर्णपदक देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. अशा एकूण 57 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन सन्मानित केले जाणार आहे.
दीक्षांत समारंभाचा कार्यक्रम झाल्यानंतर महाविद्यालयांना पदवी प्रमाणपत्र वाटप केले जाणार आहे. यासाठी विद्यापीठ परीक्षा विभागाने खास सोय केलेली आहे. या पत्रकार परिषदेस प्र-कुलगुरू प्रा लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ श्रीकांत अंधारे आदी उपस्थित होते.
अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्राविषयी चित्रांचे प्रदर्शन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त विद्यापीठामार्फत अहिल्यादेवी यांच्या जीवनचरित्र विषयांवरील चित्रांचे प्रदर्शन यानिमित्त आयोजन करण्यात आले आहे. या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल आणि मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनात एकूण 55 चित्रे ठेवण्यात येणार असून महाराष्ट्रातील मान्यवर चित्रकारांनी रेखाटलेली चित्रांचा यात समावेश आहे.