पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व जिल्हा क्रिकेट असोसिएशनमध्ये ऐतिहासिक सामंजस्य करार
आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उभारण्याचा संकल्प
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्यात आज ऐतिहासिक सामंजस्य करार (MoU) झाला. या करारामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आधुनिक क्रिकेट प्रशिक्षण, उत्कृष्ट सुविधा व व्यावसायिक मार्गदर्शन मिळणार असून विद्यापीठ परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उभारण्याचा संकल्प दोन्ही संस्थांनी केला आहे.

राष्ट्रमाता जिजाऊ व्यवस्थापन परिषद सभागृहात झालेल्या या करारप्रसंगी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप माने, चेअरमन आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील व संयुक्त सचिव खासदार धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित होते. क्रीडा संचालक व प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे आणि सहसचिव चंद्रकांत रेम्बरसू यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

या उपक्रमामुळे ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांनाही राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कुलगुरू डॉ. महानवर यांनी हा करार सोलापूरच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले, तर अध्यक्ष दिलीप माने यांनी विद्यापीठाच्या सहकार्यामुळे जिल्ह्यातील क्रिकेट संस्कृती बळकट होईल, असे मत व्यक्त केले.

आभार विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी मानले.
