पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा पाचवा नामविस्तार दिन
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा पाचवा नामविस्तार दिनाचा सोहळा बुधवार, दि. 6 मार्च 2024 रोजी साजरा करण्यात येणार असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलसचिव योगिनी घारे यांनी दिली.
सोमवारी सकाळी अकरा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रा. लक्ष्मीकांत दामा यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ज्येष्ठ अभ्यासक गोविंद काळे यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व त्यांचे लोक कल्याणकारी प्रशासन’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.
याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त उद्या (बुधवारी) एकदिवसीय शिवचरित्र अभ्यास शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पुण्यातील शिवचरित्रकार केदार फाळके आणि सुधीर थोरात हे मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमांचा विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.